नाशिक – विशेष प्रतिनिधी
कॉलेज रोडवरील एस.के मॉल येथे असलेले जगप्रसिद्ध ‘प्यूमा’ कंपनीच्या शो रूमच्या शटरचे बटन व लॉक तोडून आत शिरलेल्या चोरट्यांनी सुमारे १७ लाख रुपयांचे ब्रँडेड साहित्य व रोकड चोरून नेली. शहरात घडणाऱ्या घरफोडीच्या घटनांमुळे पोलिसांच्या रात्रगस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
प्रशांत महेश मिश्रा (वय २४, रा. शिवकृपा, महालक्ष्मी नगर, हिरावाडी रोड, पंचवटी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सोमवारी सकाळी शो रूम उघडल्यावर ही घटना लक्षात आली. रविवारी रात्री पावणेअकरा वाजताशो रूम बंद करून स्टाफ घरी गेला. त्यानंतर मध्यरात्री चोरट्यांनी शटरचे बटन व लॉक तोडून आत प्रवेश केला.
शो रूममधील नऊ लाख १८ हजार ३८८ रुपयांचे
प्यूमा कंपनीचे २५६ नग, सहा लाख ८५ हजार ९५१ रुपयांचे अॅपरेल टी शार्ट, ट्रॅक पॅन्ट, जॅकेट, शॉट पॅन्ट असे ३३७ नग, ८१ हजार २६७ रुपयांचे प्यूमा कंपनीचे अॅक्सेसिरीज त्यात बॅग, सॉक्स, कॅप, बॉटल, वॉलेट आणि गल्ल्यातील ९१ हजार रुपये असा १६ लाख ८५ हजार, ६०६ रुपयांचा माल चोरून नेला. याप्रकरणी गंगापूर पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून सहायक निरीक्षक निखील पवार तपास करत आहेत.
दोन लाखांची सोन्याची पोत चोरली…
अरुणा सुभाष देवरे (वय ६३, रा. लोकमान्यनगर, पवननगर, सिडको) या मालेगाव येथे जाण्यासाठी
मेळा स्थानकावर बसमध्ये चढत असताना यावेळी झालेल्या गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी पर्समधील दोन लाख रुपये किंमतीची व ४ तोळे ८१० मिली ग्रॅम वजनाची सोन्याची पोत चोरून नेली. सरकारवाडा पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
पोलीस असल्याची बतावणी…अंगठी चोरली
रामेश्वर महादेव भणेरकर (वय ७०, रा. सिध्देश्वर गल्ली, पिंपळगाव बसवत, ता. निफाड) हे मंगळवारी दुपारी जत्रा नांदूर लिंकरोडने जात असताना मोटारसायकल वरून तिघेजण आले. त्यांनी पोलीस असल्याची बतावणी केली. फिर्यादीच्या बोटातील ५० हजार रूपये व १० ग्रॅम वजनाची किंमतीची सोन्याची अंगठी काढण्यास भाग पाडून निघून गेले. आडगाव पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

























