– मतदार शिवसेना उमेदवारांच्या पाठिशी ठाम
पंचवटी । प्रतिनिधी
महापालिका प्रभाग क्र. १ मध्ये यापूर्वी महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सभागृह नेतेपद भूषवणाऱ्या लोकप्रतिनिधींनी गेल्या १० वर्षांपासून कोणतेही ठोस कामे केलेली नाहीत. त्यामुळेच प्रभागात रस्ते, स्वच्छता, पाणी, आरोग्य यासह विविध प्रश्न प्रलंबित आहेत. प्रभागाचा कायापालट करायचा असेल तर शिवसेना (शिंदे) गटाच्या चारही सुशिक्षित व नवीन चेहऱ्यांना संधी देऊ आणि प्रभागाच्या विकासाचा मार्ग मोकळा करू असा ठाम विश्वास मतदारांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.


प्रभाग क्रमांक एकमध्ये शिवसेना शिंदे गटाने नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१अ), गणेश चिंतामण चव्हाण (१ब), उर्मिला सुनिल निरगुडे (१क), प्रविण मंदाकिनी रमेश जाधव (१ड) या उच्चशिक्षित उमेदवारांना संधी दिली आहे. बुधवारी या उमेदवारांच्या प्रचारासाठी झालेल्या बाईक रॅलीमुळे प्रभाग भगवामय झाला असून शिवसेना उमेदवारांचे पारडे जड झाले आहे. त्याचा अनुभव गुरुवारी झालेल्या प्रचार फेरीत दिसून आला. कलानगर, पाटील लेन परिसर, रिलायन्स पेट्रोल पंप, गायत्री नगर, शुभम हाईट, निसर्ग नगर या भागात प्रचार फेरीला मतदारांचा चांगला प्रतिसाद लाभला.
या पूर्वीच्या मतदारांनी केवळ मानाची पदे भूषवली. मात्र प्रभागाच्या विकासासाठी काही केलेले नाही. त्यामुळेच खड्डेमय रस्ते, पिण्याच्या पाण्यासाठी होणारी वणवण, स्वच्छतेचा अभाव व त्यामुळे निर्माण होणाऱ्या आरोग्याच्या समस्या ही नित्याची बाब झाली आहे.
प्रभागात जलतरण तलाव, क्रीडांगणे यासारखी सुविधा उपलब्ध झाल्यास परिसरातील युवकांना योग्य दिशा मिळू शकते. युवक वाईट मार्गाकडे वळण्याऐवजी जिम्नॅस्टिक व क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन प्रभागाचे नाव उज्ज्वल करू शकतात, अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. एकूणच प्रभाग एक अंतर्गत मूलभूत सुविधांचा अभाव हा प्रमुख मुद्दा ठरत असून या पार्श्वभूमीवर प्रभागात परिवर्तन होणे ही अत्यावश्यक बाब असल्याचे मत नागरिक खुलेपणाने मांडत आहेत.

























