नाशिक – प्रतिनिधी
‘आणखी एक मोहेंजोदारो’ या माहितीपटाच्या माध्यमातून मुंबईच्या मुळांचा शोध घेतला आहे परंतु मुंबईच्या मुळांचा शोध म्हणजे मुंबईच्या अस्तित्वाचा शोध आणि तिच्या सांस्कृतिक जाणिवांचा बोध हे दोन हेतू नजरेसमोर ठेवून या माहितीपटाची निर्मिती केली, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध चित्रपट समीक्षक अशोक राणे यांनी केले
विश्वास ग्रुप व महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, शाखा जलालपूर, नाशिकतर्फे चित्रपट प्रेमींसाठी ‘सिनेमा कट्टा’ उपक्रमांतर्गत ‘आणखी एक मोहेंजोदारो’ हा चित्रपट दाखविण्यात आला आहे.
या चित्रपटाची संकल्पना, पटकथा, संकलन आणि दिग्दर्शन अशोक राणे यांचे होते. हा चित्रपट विश्वास हब येथे दाखविण्यात आला. यावेळी माहितीपटाची निर्मिती प्रकिया राणे यांनी उलगडून दाखवली.

संकल्पना, पटकथा, संकलन आणि दिग्दर्शक अशोक राणे
मुंबईतल्या गिरणी कामगारांचे आयुष्य बदलणारा ऐतिहासिक संप १९८२ साली सुरू झाला. त्या संपामुळे गिरणी कामगारांच्या या संस्कृतीचा सूर्यास्त झाला. काळाच्या ओघात गिरण्या बंद पडत गेल्या. लाखो कामगार देशोधडीला लागले. औद्योगिकदृष्ट्या देशात परिवर्तन घडून आले. कामगारांच्या जीवनातदेखील स्थित्यंतर घडून आले. परंतू, या सगळ्या गोष्टी एका क्षणात घडल्या, असा आभास माहितीपट बघताना होतो. भूतकाळातील या सगळ्या सांस्कृतिक वैभावातून एका निराशाजनक वर्तमानात आपण येतो. मुंबईचे स्थित्यंतर गिरणगावच्या कामगाराला मानवले नाही. नागरिकीकरणाच्या न्यायाने मुंबई बदलत गेली. या परिवर्तनाच्या वेगाशी अनेकांना जुळवून घेता आले नाही. काहीतरी खूप मोठी गोष्ट आपण गमावली, परंतु ती गोष्ट नेमकी काय होती, हाच प्रश्न माहितीपटाच्या शेवटी अनुत्तरित राहतो.
कारण, अनुभूतीला शब्दबद्ध करणे ही सोपी गोष्ट नसते. मोहेंजोदारोची संस्कृती लयाला का गेली, हा जसा एक अनुत्तरित प्रश्न आहे, अगदी तसाच प्रश्न दिग्दर्शकाने गिरणगावच्या बाबतीत आपल्यासमोर ठेवला आहे. गिरणगाव बदलले, हा बदल नजीकच्या काळातसुद्धा होत राहील. पण, गिरणगावच्या मूळ अस्तित्वाची पुनर्भेट या माहितीपटामुळे होत राहील. अशोक राणे यांचा सन्मान ॲड. सतीश कचोळे यांनी केला तर परिचय सूत्रसंचालन गजानन ढवळे यांनी केले. या कार्यक्रमासाठी विश्वास को-ऑप. बँक लि. नाशिक, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे, शाखा जलालपूर व विश्वास टर्फ यांचे सहकार्य लाभले.

























