– नागरिकांकडून पोलिसांच्या कारवाईचे स्वागत
पंचवटी – प्रतिनिधी
नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी नाशिक पोलीस सर्वतोपरी प्रयत्न करत असून आहेत. एक दिवसाआड शहरात खुनाच्या घटना, कोयते घेऊन तोडफोड करणारे टोळके, रिल्स बनवून दहशत माजवणाऱ्या टोळ्या पोलिसांसमोर रोज नवनवीन आवाहन उभे करत असल्याने पोलीस आता ॲक्शन मोडवर आले आहेत. पोलीस आणि मनपा अतिक्रमण विभाग यांच्यावतीने संयुक्तरित्या पंचवटीतील पेठरोड सिग्नल ते फडोळ चौक या भागातील रस्त्यावरील तसेच आरटीओ कार्यलयासमोरील भागात टवाळखोरांचे अड्डे असलेल्या टपऱ्या व हातगाड्यांचे अतिक्रमण उध्वस्त केले. नागरिकांकडून देखील पोलिसांच्या या कारवाईचे स्वागत केले जात आहे.
गुन्हेगारीला कंटाळून नाशिककर सोशल मीडियावर आपला संताप व्यक्त करत असताना दुसरीकडे पोलिसांनी आता गुन्हेगारांचे अड्डे उध्वस्त करण्यासाठी प्राधान्य दिले आहे. याची सुरुवात पंचवटी परिसरातून करण्यात आले असून आज दुपारच्या सुमारास अचानक नाशिक पोलिसांनी आरटीओ ते मखमलाबाद लिंक रोडवरील बेकायदेशीर टवाळखोरांचे अड्डे, बेकायदेशीर अतिक्रमण, चायनीज अंडा भुर्जीच्या गाड्या, गुन्हेगारीला खतपाणी घालणारी ठिकाणे उध्वस्त करण्यास सुरुवात केली आहे.
महानगरपालिकेच्या प्रशासनाशी संपर्क साधत अतिक्रमण विभागाच्या सहाय्याने अवैधरित्या उभे करण्यात आलेले शेड, बसण्याचे अड्डे उध्वस्त करत गुन्हेगारीला आळा घालण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पंचवटीसह नाशिकरोड, सिडको, सातपूर जेलरोड जुने नाशिक अशा अनेक भागांमध्ये गुन्हेगारांनी डोक वर काढल असून हेच अल्पवयीन गुन्हेगार पोलिसांसमोर मोठी डोकेदुखी ठरत आहे. दिवसागणिक वाढणारी गुन्हेगारी सर्वसामान्य नाशिककरांना त्रासदायक ठरू पहात आहे. त्यामुळे नाशिक पोलिसांवर टीकेची झोड उठली असल्याने पोलीस आयुक्त संदिप कर्णिक यांच्या आदेशान्वये नाशिक पोलीस आता ॲक्शन मोडवर आले असल्याची प्रचिती यामुळे समोर आली आहे. या मोहिमेत स्वतः पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलिस उपआयुक्त मोनिका राऊत, सहायक पोलिस आयुक्त संगीता निकम, पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील, म्हसरूळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण गुन्हे शोध पथकाचे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी मनपा अतिक्रमण विभागाचे कर्मचारी सहभागी झाले होते.
नाशिकमध्ये ‘जेसीबी पॕटर्न’
उत्तर प्रदेशात गुन्हेगारांविरुद्ध बहुचर्चित बुलडोजर पॕटर्न राबवण्यात येतो. त्याच धर्तीवर आज पंचवटीत थेट जेसीबीने कारवाई करण्यात आली.
प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) समोरील जवळपास २० ते २५ टपऱ्या आणि शेड तसेच नानासाहेब धर्माधिकारी मार्ग, स्वर्गीय गंगाधर बाबुराव फडोळ चौक लिंकरोड ते शरद चंद्र पवार मार्केट यार्ड सिग्नल पर्यंत असलेल्या अनधिकृत टपऱ्या आणि शेड थेट जेसीबीच्या सहाय्याने जमीन दोस्त करण्यात आले आहेत. या दरम्यान काही व्यावसायिकांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी हिसका दाखवताच शांत बसले.



























