नाशिक – विशेष प्रतिनिधी
शहरात पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली तरी राजकीय पक्षांतराचे वारे मात्र जोमाने वहात आहे. गुरूवारी मुंबईतील भाजपा कार्यालयात विधानसभा निवडणुकीतील बंडखोर गणेश गिते, माजी नगरसेवक कमलेश बोडके, सीमा ताजणे, ठाकरे गटाचे माजी नगरसेवक सचिन मराठे, प्रशांत दिवे तसेच पदाधिकाऱ्यांनी पक्ष प्रवेश केला.
प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, कुंभमेळा मंत्री ना. गिरीश महाजन, प्रदेश पदाधिकारी विजय चौधरी, लक्ष्मण सावजी, आ. राहूल ढिकले, विजय साने, माजी आमदार बाळासाहेब सानप, शहराध्यक्ष सुनील केदार, प्रशांत जाधव, सुधाकर बडगुजर आदी याप्रसंगी उपस्थित होते.
महापालिका निवडणुकीची चाहूल लागताच शहरातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यातील सत्ताधारी भाजपा व शिवसेना शिंदे गटात जाण्यासाठी माजी नगरसेवक व इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे. त्याचा सर्वाधिक फटका राष्ट्रवादी (शरद पवार) व शिवसेना ठाकरे गटाला बसला आहे.

























