मुंबई –
संघ व भाजपाचा मजबूत गड समजल्या जाणाऱ्या डोंबिवलीतून सलग चार वेळा विधानसभेवर निवडून जाणारे रविंद्र चव्हाण यांची भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. विद्यार्थी दशेपासून राजकारणात आल्यानंतर पक्षातील विविध जबाबदाऱ्यांसह नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, आमदार, मंत्री व आता प्रदेशाध्यक्ष असा पल्ला गाठणारे रविंद्र चव्हाण यांच्यासमोर आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पक्षाला ‘शत-प्रतिशत’ यश मिळवून देण्याची जबाबदारी असेल.
प्रदेश भाजपा अध्यक्षपदाच्या निवडणूक प्रक्रियेत केवळ रविंद्र चव्हाण यांचा अर्ज आल्याने भाजपाचे नेते व केंद्रीय संसदीय कार्य व अल्पसंख्यांक मंत्री किरण रिजिजू यांनी चव्हाण यांच्या निवडीची घोषणा केली. विधानसभा निवडणुकीतील भाजपाच्या यशानंतर चव्हाण यांच्याकडे प्रदेशाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. ना. बावनकुळे यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत पक्षाने विधानसभा निवडणुकीत भरघोस यश मिळवल्याने राज्यात युतीचे सरकार सत्तेवर आले होते.
नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांचे राष्ट्रीय महामंत्री अरुण सिंह, ना. नितीन गाडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना. बावनकुळे, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, जयकुमार गोरे, अतुल सावे, गणेश नाईक, खा. नारायण राणे, अशोक चव्हाण, प्रसाद लाड यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

























