– ठाणे, पुणे, नाशिक, मुंबईकर खेळाडूंची आगेकूच…
नासिक – विशेष प्रतिनिधी
जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनच्या वतीने आयोजित महाराष्ट्र राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत १७ वर्षाखालील मुलींच्या व मुलांच्या गटात ठाणे, पुणे, नाशिक, मुंबईच्या टेबल टेनिसपटूंनी उपउपांत्य फेरीत शानदार विजय मिळवित उपांत्य फेरी गाठली. स्पर्धेत सुक्रती शर्मा, स्वरा करमरकर, नायशा रेवासकर यांनी विजयी घोडदौड कायम ठेवली आहे.
१७ वर्षाखालील मुलीच्या गटात नाशिकच्या दुसऱ्या मानांकित स्वरा करमरकरने ठाण्याच्या अन्वी गुप्ते ला ३-२ ने पराभूत केले. अत्यंत चुरशीने खेळलेल्या या सामन्यात स्वरा ने ६-११ व ९-११ असे दोन गेम गमावल्याने ०-२ असे पिछाडीवर पडलेल्या स्वरा ने पुढील दोन गेम ११-४ ११-६ असे जिंकून बरोबरी साधली व आपले आव्हान टिकवण्यात यश मिळविले. शेवटच्या पाचवा गेम काउंटर अँटक पद्धतीने खेळून दोघींनी सामन्यावर पकड ठेवण्याचा प्रयत्न केला. शेवटी १०-१० समान गुणापर्यंत हा सामना पोहोचला. सरतेशेवटी स्वरा ने मोक्याच्या क्षणी शेवटचे दोन गुण मिळवून सामना आपल्या बाजूने झुकविण्यात यश मिळवून विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला.
दुसऱ्या सामन्यात बिगर मानांकित ठाण्याच्या वैदेही ठाणेकरने रायगडच्या पाचव्या मानांकीत अनिशा पात्रा चा १०-१२, ११-३, ८-११, ११-६, ११-५ असा ३-२ पराभव केला. या सामन्यात दोघींनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. परंतु शेवटच्या गेम मधे खेळावर नियंत्रण ठेवत वैदेही हीने विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले व उपांत्य फेरीत प्रवेश केला. प्रथम मानांकित ठाण्याच्या सुक्रती शर्माने नाशिकच्या जान्हवी कळसेकरचा ११-६, १२-१०, ११-८ असा ३-० ने पराभव करून सफाईदार विजय मिळविला तर याच गटात पुण्याच्या तिसऱ्या मानांकित नायशा रेवासकर हीने औरंगाबादच्या अनन्या सोमानीचा ९-११, ११-५, ११-६, ११-५ असा ३-१ ने पराभव करून उपांत्य फेरी गाठली.
१७ वर्षाखालील मुलांच्या गटात उपउपांत्य फेरीत पार्थ मगर (मुंबई) ने पुण्याच्या श्रेयस माणकेश्वर याचा ३-० असा तर इशान खांडेकर (पुणे) याने कोल्हापूरच्या संकल्प बांदिवडेकर याचा ३-० तसेच प्रतीक तुलसानी (ठाणे) याने मुंबईच्या अर्णव वाघ याचा ३-० व रामानुज जाधव (पुणे) याने ठाण्याच्या एकांश मदाने चा ४-१ ने पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. १५ वर्षाखालील मुलींच्या गटात तिसऱ्या फेरीअखेर ठाणे, पुणे, टीएसटीए च्या टेबल खेळाडूंची विजयी घोडदौड चालू असून त्यामध्ये सान्वी पुराणिक, आरोही चाफेकर, अनन्या बेडिंगवाला, केशिक पुरकर, श्रेया गायकवाड, मायरा सांगेलकर यांचा समावेश आहे तर १५ वर्षाखालील पाटेकर, एकांश मदाने, निवान सेठ, श्रेयस माणकेश्वर, यश भंडारी यांनी चौथ्या फेरीत प्रवेश केला.

























