नाशिक – विशेष प्रतिनिधी
नुकत्याच पुणे येथे झालेल्या बालुफ याटोमेशान चषक ५४ व्या आंतरजिल्हा व ८७ व्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत १९ वर्षाखालील मुलांच्या गटाचे नाशिकच्या कुशल चोपडाने राज्य अजिंक्यपद मिळवित सुवर्ण पदक पटकावले. कुशलने सलग चार वर्ष हे विजेतेपद आपल्याकडे राखले आहे. याच स्पर्धेत केशिका पुरकरने १३ वर्षाखालील मुलीच्या गटात रजत पदक तर १५ वर्षाखालील मुलींच्या गटात कांस्य पदक मिळवून दोन पदके मिळविली. स्वरा करमरकरने १७ वर्षाखालील मुलींच्या गटात कांस्य पदक पटकावले.
या स्पर्धा महाराष्ट्र स्टेट टेबल टेनिस असोसिएशनच्या अधिपत्याखाली पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धा राजीव बोडस, प्रकाश तुळपुळे, राम कोणकर व आशिष बोडस यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आल्या होत्या. १९ वर्षाखालील मुलांच्या गटात सातवे मानांकन असलेल्या नाशिकच्या कुशल चोपडाने उपांत्य फेरीत टीएसटीटीए मुंबईच्या सहावे मानांकन असलेल्या आकांश साहूचा १२-१०, ११-३, ११-५ असा ३-० ने सहज पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत त्याची गाठ पडली ती पुण्याच्या प्रथम मानांकित ईशान खांडेकरशी. या सामन्यात कुशल चोपडा ने आपल्या अनुभवाच्या व आक्रमक खेळाच्या बळावर पहिले दोन गेम ११-७ व ११-७ असे जिंकून २-० ने आघाडी घेऊन सामन्यावर आपली पकड घट्ट केली. परंतु इशान खांडेकर याने पुढील दोन गेम ११-६ व ११-८ असे जिंकून २-२ अशी बरोबरी करत आपले स्पर्धेतील आव्हान टिकवण्यात यश मिळविले. परंतु कुशल चोपडाने पुढील दोन गेम ११-६ व ११-३ असे सहज जिंकून राज्य अजिंक्यपद आपल्या नावे केले आणि सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला.
१३ वर्षाखालील मुलींच्या गटात नाशिकच्या प्रथम मानांकित केशिक पुरकरला अंतिम फेरीत ठाण्याच्या दुसऱ्या मानांकित धनश्री तरडे हिने ११-९, ११-४, १२-१० असे ३-० ने पराभूत केल्यामुळे रजत पदकावर समाधान मानावे लागले. उपांत्य फेरीत केशिकाने ठाण्याच्या चौथ्या मानांकित जिनया वधान हिचा १२-१०, ११-७, ११-५ असा ३-० ने पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. या वर्षीच्या तिन्ही राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत अजिंक्यपद मिळविणाऱ्या केशिकाचे राज्य अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण पदक मिळविण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. १५ वर्षाखालील मुलींच्या गटात सहाव्या मानांकन असलेल्या आद्या बाहेती हिने केशिका चा ११-९, ७-११, ११-९, ११-६ असा ३-१ ने पराभव केल्यामुळे केशिकाला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.
१७ वर्षाखालील मुलींच्या गटात नाशिकच्या तिसऱ्या मानांकित स्वरा करमरकरला उपांत्य फेरीत पुण्याच्या दुसऱ्या मानांकित नायशा रेवासकर बरोबर झालेल्या चुरशीच्या सामन्यात ३-२ ने पराभवाला सामोरे जावे लागल्याने कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. या सामन्यात नायशा रेवासकरणे ९-११. ११-६, ६-११, ११-९, ११-६ असा ३-२ ने करमरकरचा पराभव केला. त्यांच्या या यशाबद्दल नासिक जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड, उपाध्यक्ष शेखर भंडारी, मिलिंद कचोळे, राजेश भरवीरकर, अभिषेक छाजेड, सौ. अलका कुलकर्णी, संजय वसंत, अलीअसगर आदमजी आदी मान्यवरांनी अभिनंदन केले.

























