नाशिक – विशेष प्रतिनिधी
घरफोडीचा बनाव करून दिराच्याच घरातून ५० लाखांहून अधिक किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेणाऱ्या भावजयीचे पितळ अखेर उघडे पडले आहे. या घटनेत भावजयीला साथ देणाऱ्या मुंबईतील मैत्रिणीला अहमदाबाद येथून जेरबंद करण्यात मुंबई नाका पोलिसांना यश आले असून तिच्याकडून ४६ लाखांचे दागिने हस्तगत करण्यातही यश आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमरिता दिव्येश ठक्कर (रा- मुंबई) असे मैत्रिणीचे नाव आहे. मनोज विनोद कांकरिया यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते कुटुंबियांसह ५ एप्रिल २०२५ रोजी मुंबईतील घरी गेले होते. ७ एप्रिलला नाशिकला परतल्यावर त्यांना घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले होते. या घटनेत तब्बल ५९ लाख ८५ हजार ३०० रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने व पैसे चोरीला गेले होते. सदर गुन्हयाचा तपास करत असतांना घटनास्थळावर कोणतीही तोडफोड केल्याचे दिसून येत नव्हते त्यावरुन गुन्हा हा परिचीत इसमाने केला असल्याची शक्यता होती. त्या अनुषंगाने अधिक तपास केला असता गुन्हा हा फिर्यादीच्या भावजयीने केला असल्याचे निष्पन्न झाले होते. परंतू भावजय मागील चार महिन्यांपासून आपले संपर्काचे सर्व साधने बंद करुन आपले अस्तित्व लपविले होते.
तिचा वेळोवेळी शोध घेतला परंतु ती मिळून येत नव्हती. गुन्हेशोध पथकाचे प्रभारी अधिकारी उपनिरीक्षक समद बेग यांना गोपनिय व तांत्रिक बाबींच्या आधारे ती मुंबई येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हेशोथ पथकाने मुंबई येथे जावून तिला ताब्यात घेतले. पोलीस कोठडीच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये आरोपीने तपासकामात सहकार्य केले नाही. परंतु आरोपीला अधिक विश्वासात घेवून विचारपूस केली असता हा गुन्हा तिने मैत्रिण अमरिता दिव्येश ठक्कर हिचे सोबत संगनमत करुन केल्याची माहिती दिली. त्या अनुषंगाने गुन्हेशोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी अथक प्रवास व प्रयत्न करुन अहमदाबाद, गुजरात या ठिकाणी सापळा रचुन अमरिता दिव्येश ठक्कर हिला अटक केली. दोन्ही आरोपीत यांचेकडे समोरासमोर तपास केला असता त्यांनी सदर गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यांचेकडून ५२ तोळे वजनाचे ४६ लाख रुपये किंमतीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.
पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, उपायुक्त श्रीमती मोनिका राउत व सहायक आयुक्त नितीन जाधव यांचे मार्गदर्शनाखाली व वरिष्ठ निरीक्षक संतोष नरूटे व सहायक निरीक्षक (गुन्हे) सुधीर पाटील यांचे सुचनांनुसार गुन्हे शोध पथकाचे अधिकारी उपनिरीक्षक समद बेग, सहायक उपनिरीक्षक रोहीदास सोनार, हवालदार देविदास गाढवे, योगेश अपसुंदे, समीर शेख, आकाश सोनवणे, राजेंद्र नाकोडे, नवनाथ उगले, गणेश बोरनारे, दिपक जगदाळे, श्रीकांत कर्पे, जुबेर सैय्यद, श्रीमती भालेराव, नागरे, प्रेरणा शेळके, मोहिनी चव्हाण यांनी ही कामगिरी बजावली आहे.

























