मुंबई – विशेष प्रतिनिधी
हिंदी सक्तीला विरोध…वाढदिवसानिमित्त सदिच्छा भेट यानंतर आज (दि.२७) विघ्नहर्त्याच्या आगमनानंतर ठाकरे बंधू यांची पुन्हा भेट झाली.,
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या निवास जाऊन गणपतीचे दर्शन घेतले. राज ठाकरे यांनी शिवसेना पक्ष सोडल्यानंतर तब्बल २२ वर्षांनी उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या घरी गेले.
उद्धव ठाकरे यांनी सहपरिवार ‘शिवतीर्थ’ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जात गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी आदित्य ठाकरे तसेच रश्मी ठाकरे उपस्थित होत्या. उद्धव ठाकरे यांना राज ठाकरे यांनी फोन करत गणपती दर्शनाचे निमंत्रण दिले होते. त्याला सकारात्मक उत्तर दिल्यानंतर उद्धव ठाकरेंनी शिवतीर्थ गाठले होते. यावेळी दोन्ही कुटुंबात स्नेहभोजन देखील झाले. तसेच दोघांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. तसेच स्नेहभोजन करत असताना देखील सगळे सोबतच होते. त्यामुळे आता पुन्हा एकदा युतीच्या चर्चांना उधाण येऊ शकते. 
मराठी भाषेच्या मुद्द्यावरून विजयी मेळावा घेत ठाकरे बंधू एकत्र आले होते. त्यानंतर २७ जुलै रोजी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जात त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये जवळीक वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने दोन्ही नेते युती करणार असल्याचे बोलले जात आहे. तिसऱ्या भेटीत नवीन राजकीय समीकरणाचा श्रीगणेशा होईल, अशीही शिवसैनिक व मनसैनिकांमध्ये चर्चा आहे.

























