नाशिक – विशेष प्रतिनिधी
उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन टोळ्यांमधील वादातून एकमेकांन संपवण्यासाठी गावठी पिस्तुलातून गोळीबार तसेच घरावर हल्ला करण्याची खळबळजनक घटना बुधवारी मध्यरात्री घडली. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन गुंडा विरोधी पथकाने यातील संशयित इरशाद मोहम्मद अली चौधरी (वय-२९ वर्षे रा. एवर स्विट अपार्टमेंट, फ्लॅट नं ७, रजा कॉलनी, देवळाली गाव, नाशिकरोड) यास अवघ्या १२ तासात जेरबंद केले. त्याकडून या गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट कार, दोन गावठी पिस्तूल तसेच फायर झालेला राउंडचा तुकडा हस्तगत करण्यात आला आहे.
याबाबतचे अधिक वृत्त असे की, बुधवारी (दि. १०) मध्यरात्री दोन वाजता सराईत गुन्हेगार राहुल उज्जैनवाल व त्याचे विरोधक सराईत गुन्हेगार रोहित डिंगम उर्फ माले, टक्या उर्फ सनी पगारे, इरशाद चौधरी, बारक्या उर्फ श्रीकांत वाकोडे, सुशांत नाठे यांनी परस्पर विरोधात एकमेकांच्या टोळीच्या वर्चस्वावरुन व हप्ते जमा करण्यावरुन वादविवाद केला. सार्वजनिक जागेत लाकडी दांडके, व धारधार शस्त्रानिशी जात दहशत निर्माण करुन एकमेकांना जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने गावठी कट्टयाने गोळीबार केला. तसेच रोहित डिंगम व त्याचे साथिदारांनी राहुल उज्जैनवाल याची काकू जरलीन हिच्या घरावर दगड व बिअरच्या बाटल्या फेकून पळून गेले.
या घटनेची माहिती मिळताच उपनगर पोलिसांनी
भारतीय न्याय संहिता कलम १०९, १९४ (२), १८९(२), १९१(२), १९१(३), १२५, भारतीय हत्यार कायदा कलम ३,२५ मपोकाक १३५ अन्वये गुन्हा दाखल केला होता. हा वाद दोन गँग मधील वर्चस्ववादावरुन झाला असल्याने या गंभीर स्वरुपाच्या गुन्हयातील आरोपींना अटक करण्याचे आदेश पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुंडा विरोधी पथकास दिले. त्या अनुषंगाने सहायक आयुक्त (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे दोन पथके तयार करून गुन्हयातील आरोपींच्या ठावठिकाणा व त्यांचे मित्र परिवार यांची माहिती काढण्यास सुरुवात केली.
गुंडा विरोधी पथकाचे प्रभारी सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस अंमलदार विजय सुर्यवंशी, प्रदिप ठाकरे, राजेश राठोड, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, कल्पेश जाधव अशांना केरु पाटील नगर (जेलरोड, नाशिकरोड) येथे एक चारचाकी वाहन त्याची मागील काच फुटलेली होती. ती संशयितरित्या उभी असल्याचे दिसून आल्याने पथकाने या वाहनाजवळ सापळा रचला. तेव्हा थोड्या वेळात एकजण गाडी जवळ आल्याने त्यास पथकाने शिताफीने ताब्यात घेवून विचारपुस केली असता तो गुन्हयातील आरोपी इरशाद चौधरी हा होता. त्याचेजवळ असलेल्या मारुती कंपनीची स्विफ्ट कार (एमएच १५ – डीसी ७०९९) मध्ये दोन देशी बनावटीचे पिस्तूल व एक फायर झालेला राउंडचा तुकडा मिळून आला. घडलेल्या प्रकारात ती गाडी व दोन देशी बनावटीचे पिस्तूल वापरल्याचे निष्पन्न झाल्याने इरशाद मोहम्मद अली चौधरी यास कार, दोन गावठी पिस्तूल, एक फायर झालेला राउंडचा तुकडा, मोबाईल ३ लाख, ३० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संशयितास पुढील कारवाईसाठी उपनगर पोलीस स्टेशचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान याच प्रकरणातील सनी उर्फ टक्या रावसाहेब पगारे (रा. जेतवन नगर, जयभवानी रोड) या अंडड पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतले. गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाचे सहायक निरीक्षक हिरामण भोये, उपनिरीक्षक चेतन श्रीवंत व अंमलदारांनी शैबाज आरिफ पिरजादे (रा. हरीमंझिल सोसायटी, द्वारका) व तीन विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेतले आहे.
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, सहायक आयुक्त संदीप मिटके (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, मलंग गुंजाळ, विजय सुर्यवंशी, सुनिल आडके, प्रदिप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, राजेश राठोड, कल्पेश जाधव, सुनिता कवडे यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली आहे.

























