नाशिक – विशेष प्रतिनिधी
शहरातील सर्वच रस्त्यांवर पडलेल्या खड्डयांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. ‘सेल्फी विथ खड्डा’ या अभिनव आंदोलनाला प्रारंभ केल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने थेट महापालिका मुख्यालयात धडक मारली. रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवावेत, निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाका अन्यथा महापालिकेच्या राजीव गांधी भवनासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
महापालिका अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात, शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील खड्डयाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे.
या निवेदनाचा आशय असा, नाशिक हे स्मार्ट सिटी अंतर्गत निवडले गेलेले एक प्रमुख शहर असूनसुद्धा सध्या शहरातील प्रमुख रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. नाशिक रोड, पंचवटी, नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम, सातपूर, सिडको या विभागीय मनपा कार्यालयाच्या हद्दीतील प्रमुख रस्त्यांवर व शहराच्या अंतर्गत कॉलनी रस्त्यांवर असंख्य खड्डे पडलेले आहेत.
या रस्त्यांची अवस्था इतकी भयावह आहे की, खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डे हेच समजेनासे झाले आहे. खड्यांमध्ये पावसाचे पाणी भरल्यामुळे ते दिसत नाहीत, त्यामुळे अपघात होत आहेत. अनेक ठिकाणी नागरिक जखमी झालेले असून काही गंभीर घटनाही घडलेल्या आहेत. ही परिस्थिती पाहता नागरिकांना जीव गमवण्याची भिती आहे. महानगरपालिकेच्या हद्दीतील राज्य महामार्गांचीही अवस्था वेगळी नाही. रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीकडे प्रशासनाचे पूर्णतः दुर्लक्ष झाले असून, यामुळे नाशिककरांमध्ये प्रचंड संतापाची भावना आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने ‘सेल्फी विथ खड्ड’ या जनजागृती आणि निषेधात्मक आंदोलनाची सुरुवात करण्यात आली आहे. नागरिकांनी आपल्या परिसरातील खड्ड्यांचे फोटो काढून #SelfieWithKhadda हॅशटॅगसह सोशल मीडियावर पोस्ट करत प्रशासनाचे लक्ष वेधण्यास सुरुवात केली आहे.
आम्ही मागणी करतो की, नाशिक शहरातील सर्व प्रभागांतील प्रमुख रस्ते व कॉलनी रस्ते तसेच महापालिका हद्दीतील महामार्गावरील खड्डे तातडीने बुजवण्यात यावेत. या कामांसाठी ठराविक मुदतील कार्यवाही होऊन, लवकरात लवकर परिणाम दिसावा. ज्यांच्या मुळे रस्त्यांची दुर्दशा झालेली आहे त्या ठेकेदारांनी निकृष्ट दर्जाचे काम केले असेल अशांना त्वरीत काळ्या यादीत टाकण्यात यावे. जर हे खड्डे बुजवले गेले नाहीत, तर ‘सेल्फी विथ खड्डा’ च्या पुढील टप्प्यात ‘राजीव गांधी भवनवर तीव्र आदोलन केले जाईल.
याप्रसंगी शिवसेना उपनेते दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख डी.जी. सूर्यवंशी, महानगरप्रमुख प्रथमेश गिते, उपजिल्हाप्रमुख केशव पोरजे, माजी आमदार वसंत गिते, मसुद जिलानी, बाळासाहेब कोकणे, राहूल दराडे, सचिन बांडे, शैलेश सूर्यवंशी, दिलीप मोरे, नंदू वराडे, शरद दातीर, विरेंद्रसिंग टिळे, रितेश साळवे, सुभाष शेजवळ, प्रविण चव्हाण, ऋषी वर्मा, संजय गोसावी, धनंजय गवळी, रविंद्र गामणे, संदेश फुले, योगेश गाडेकर, देवा जाधव, महेंद्र आढाव, उत्तम कोठुळे, सुमंत कारवाळ, रणजित हिंगमिरे, किशोर दिघे, शाम कंगले, सुनील भालेकर, सुनील निरगुडे, महेंद्र आव्हाड, प्रमोद नाथेकर, महिला आघाडीच्या भारती ताजनपुरे, स्वाती पाटील, किर्ती जावडेकर, शोभा पवार, शोभा दोंदे, गुड्डी फमिंदा, योगिता गायकवाड, माधुरी पाटील, सुवर्णा काळुंगे, श्रद्धा दुसाने, राणी गवळी, शोभा बांडे, शोभा दळवी आदी उपस्थित होते.

























