नाशिक – विशेष प्रतिनिधी
गुन्हयामध्ये अरेस्ट करण्याची भिती दाखवून तिघा नाशिककरांना सायबर गुन्हेगारांनी तब्बल ९६ लाखांना गंडवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ‘डिजिटल ॲरेस्ट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गुन्ह्यात दोन महिलांसह एका पुरुषाला गंडवले आहे. शहर पोलिसांच्या सायबर पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून पुढील तपास सुरु आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन स्वतंत्र घटना घडल्या असून त्यात निरज दिगंबर बापट यांना ५० लाख, जयश्री विष्णु जोशी यांना ३६ लाख ९१ हजार २३४ तर वृषाली महेंद्र पन्हाळे यांना नऊ लाख ३८ हजार १० रुपयांना गंडवण्यात आले आहे. अत्यंत नियोजधबद्ध पद्धतीने सायबर गुन्हेगारांनी तिघा नाशिककरांना
१६ मोबाईल क्रमांकाद्वारे संपर्क साधून गुन्हयामध्ये अरेस्ट करण्याची भिती दाखवली. तसेच तिघांकडील पैशांची पडताळणी करण्याच्या बहाण्याने विविध बँक खात्यात पैसे भरण्याचे सांगून गंडवण्यात आले आहे. फसवणुकीची एकूण रक्कम ९६ लाख २९ हजार २४४ इतकी असून सायबर पोलिसांनी यातील मोबाईल क्रमांक धारक तसेच बँक खाते धारकांविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष ढवळे तपास करत आहेत.
सावधानता बाळगा !
भारतात ‘डिजिटल ॲरेस्ट’ अशी कोणतीही तरतूद अस्तित्वात नाही. हे फक्त घाबरवून पैसे लुटण्याचा फंडा आहे. कोणाला ‘डिजिटल ॲरेस्ट’ ची धमकी गुन्हेगार देत असेल तर आपली वैयक्तिक माहिती व ‘ओटीपी’ देऊ नका. नजिकच्या सायबर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.

























