नाशिक – विशेष प्रतिनिधी
केंद्र शासनाच्या नशामुक्त भारत अभियानाअंतर्गत
नाशिक ग्रामीण पोलीस दलातर्फे जिल्हयात “अंमली पदार्थ विरोधी शपथग्रहण समारंभ” आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमात स्वातंत्र दिनाचे औचित्य साधुन दि. १५ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ०८:०० वा. जिल्हयातील शाळा व महाविद्यालये आणि ग्रामपंचायती अशा एकुण २३३० ठिकाणी अंमली पदार्थ विरोधात शपथ घेण्यात आली.
या ऐतिहासिक मोहिमेत ०४ लाख ६६ हजार विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ, महिला बचत गट, पोलीस अधिकारी व कर्मचारी, समजासेवक, राजकिय पदाधिकारी यांनी उत्स्फुर्त सहभाग घेतला. यावेळी शाळा, महाविद्यालयांचे मैदाने आणि ग्रामपंचायतीच्या सभागृह, आवारामध्ये एकाचवेळी शपथ घेतांना देशभक्तीचे आणि एकतेचे वातावरण निर्माण झाले. शपथ घेतांना सर्वांनी एकमुखाने जाहिर केले की, ‘आम्ही कोणत्याही प्रकारचे नशापदार्थ सेवन करणार नाही आणि इतरांनाही त्यापासून दुर ठेवण्यासाठी प्रयत्न करू, नशामुक्त, निरोगी आणि सक्षम भारत घडविण्यासाठी आम्ही कटीबध्द राहू’ असा संकल्प एकत्रितपणे करण्यात आला.

तरूणाई ही कोणत्याही राष्ट्राची उर्जा असते आणि तरूणांच्या शक्तीचे समाज आणि देशाच्या विकासात महत्वाचे योगदान आहे. त्यापार्श्वभुमीवर जिल्हयातील शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या अभियानात मोठ्या प्रमाणात सहभागी होवून देशासमोरील हे आव्हान स्वीकारून अंमली पदार्थ मुक्त करण्याचा दृढ संकल्प यावेळी करण्यात आला. अंमली पदार्थांच्या दुष्परिणामाबाबत व धोक्यांविरूध्द लढण्यासाठी जनजागुंती निर्माण करणे हा या नशामुक्त अभियानाचा उद्देश आहे. त्याअनुषंगाने जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे, शाळा महाविद्यालये, ग्रामपंचायत, शासकिय कार्यायले इत्यादी ठिकाणांवर जनजागृती मोहिम, रॅली, चर्चासत्रे, कार्यशाळा, तसेच नशामुक्तीसाठी समाज माध्यमांवर प्रभाव पडणा-या रिल्स आणि मॅसेज स्पर्धा, Say No to Drugs घोषवाक्या संबंधी चित्रकला व निबंध स्पर्धा असे विविध उपक्रम या अभियानाअंतर्गत राबविण्यात येणार आहे.

नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार राबविण्यात येणाऱ्या अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहिमेत जास्तीत जास्त तरूण वर्ग तसेच नागरीकांनी सहभागी होवून मोलाचे योगदान द्यावे असे आवाहन यावेळी नाशिक ग्रामीण पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे.



























