नाशिक – विशेष प्रतिनिधी
सांगली येथे झालेल्या दुसऱ्या राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत नाशिकच्या केशिक पुरकर हिने सुवर्ण तर स्वरा करमरकर यांनी दोन वयोगटात रजत व कांस्य पदक पटकावले. केशिका पुरकरचे पाठोपाठ झालेल्या राज्य मानांकन स्पर्धेतील दुसरे सुवर्ण पदक आहे तर स्वरा करमरकरचे राज्य मानांकन स्पर्धेतील तिसरे पदक आहे.
१३ वर्षाखालील मुलींच्या गटात नाशिकच्या केशिका पुरकरने उपांत्य पूर्व फेरीत ठाण्याच्या प्रिशा मलिक चा ११-७, ११-९, ११-७ असा ३-० ने सहज पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत तिची गाठ पडली ती ठाण्याच्या विनया वदाणे हिच्याशी. केशिकाने विनया वदाणेचा ११-७, ९-११, ११-७, ११-९ असा ३-१ ने पराभव करून अंतिम फेरी गाठली अंतिम फेरीत केशिका पुरकरने टीएसटीटीए मुंबईच्या हितन्या दिवेकरचा झालेल्या लढतीत अपेक्षेप्रमाणे ११-८, ११-९, १२-१० असा ३-० असा सरळ पराभव करून राज्य विजेतेपद पटकावत सुवर्ण पदक आपल्या नावे केले. केशिकाने मागच्या वर्षी याच गटाचे राष्ट्रीय विजेतेपद पटकावले होते.
१७ वर्षाखालील गटात नाशिकच्या स्वरा करमरकरने उपांत्य पूर्व फेरीत ठाण्याच्या सानवी पुराणिकचा ११-८, ११-९, ११-९ असा ३ सरळ गेमने पराभव करून उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरीत तिने ठाण्याच्याच हित्रिका मधुर चा झालेल्या चुरशीच्या लढतीत ७-११, ९-११, ११-७, ११-९, १२-१० असा ३-२ ने पराभव करून अंतिम फेरी गाठली. या झालेल्या सामन्यात पहिले दोन गेम स्वरा पिछाडीवर होती परंतु पुढील तीन गेम जिंकून तिने अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत मात्र तिला ठाण्याच्या सुकृती शर्माने अटीतटीच्या लढतीत ११-७, ११-९, ९-११, ९-११, १२-१४ असे ३-२ ने पराभवाला सामोरे जावे लागले त्यामुळे तिला रजत पदकावर समाधान मानावे लागले. १९ वर्षाखालील मुलींच्या गटात स्वरा करमरकरचा उपांत्य फेरीत टीएसटीटीए मुंबईच्या श्रावणी लोके ने ११-४, ११-६, ८-११, ५-११, ११-१३ असा ३-२ ने पराभव केला. त्यामुळे स्वराला या गटात कांस्य पदक मिळाले.
या यशाबद्दल नासिक जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड, उपाध्यक्ष शेखर भंडारी, सचिव राजेश भरवीरकर, कोषाध्यक्ष अभिषेक छाजेड, संजय वसंत, कोच जय मोडक व पुनीत देसाई सुहास आघारकर, संदीप भागवत, ज्योती कुलकर्णी, प्रवीण कुलकर्णी, स्वाती आघारकर, वंदना कोटेचा आदी मान्यवरांनी केले.

























