पंचवटी – प्रतिनिधी
शहरातील वाहतूक कोंडीवर उपाययोजना करून नागरिकांना सुरक्षित व चांगली वाहूतक व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने बेशिस्त रिक्षा चालकांच्या विरोधात शहर वाहतूक शाखा आणि आरटीओ यांच्या संयुक्त विद्यमाने मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत ५० बेशिस्त रिक्षा चालकांच्या विरोधात कारवाई करून त्यांच्याकडून सुमारे २ लाख १ हजार ४०० रुपये दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज पत्की यांनी दिली.
पोलीस आयुक्त संदिप कर्णिक यांच्या आदेशान्वये नाशिक शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळविण्यासाठी तसेच नागरीकांना सुरक्षित व सुकर शिस्तबध्द वाहतुक व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने पोलीस उप आयुक्त, (वाहतुक) श्रीमती किरिथिका सी. एम. सहाय्यक पोलीस आयुक्त (अतिरिक्त कार्यभार) संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज पत्की
सहाय्यक निरीक्षक खैरनार, प्रादेशिक मोटर वाहन निरीक्षक अधिकारी योगेश सापिजे, वाघमारे तसेच पोलीस अंमलदार व आरटीओ यांनी राजदुत हॉटेल, सिव्हिल हॉस्पिटल समोर व सिटी सेंटर मॉल सिग्नल आदी ठिकाणी संयुक्त कारवाई राबविण्यात आली.
यात रिक्षा चालकांनी गणवेश परिधान न करणे, फ्रंटशिट प्रवाशी, वाहतुकीस अडथळा करणे बॅच व आदी कागदपत्रे न बाळगणे अशा बेशिस्त रिक्षा चालंकावर कारवाई करण्यात आली. या कारवाईत ५० रिक्षांवर ईचलान कारवाई करण्यात येवुन २ लाख एक हजार ४०० दंड वसुल करण्यात आला आहे. तसेच बेशिस्त रिक्षा चालंकावर नियम न पाळल्यास रिक्षा जप्त करण्यात येवून परवाने निलंबित करण्यात आल्याच्या सूचना वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज पत्की यांनी दिल्या आहेत.

























