नाशिक – विशेष प्रतिनिधी
प्रेमसंबंध तुटल्यानंतर सोबत राहण्यास नकार देणाऱ्या पेट्रोल पंपावरील महिला सेल्समनवर कोयत्याने प्राणघातक हल्ला करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी न्यायालयाने आरोपी प्रमोद प्रकाश गोसावी (वय ३७, रा. गोसावी वाडा, इगतपुरी नगर पालिका शेजारी, इगतपुरी) यास १० वर्ष सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
जिल्हा व सत्र न्यायालयाच्या (कोर्ट क्रमांक ०२) श्रीमती आर.एन. पांढरे यांनी सदर गुन्हयातील आरोपीविरुध्द फिर्यादी, साक्षीदार, पंच यांनी दिलेली साक्ष व तपासी अंमलदार यांनी सादर केलेल्या परिस्थिीतीजन्य पुराव्यास अनुसरून आरोपीतास सीआरपीसी कलम २३५ (२) अन्वये दोषी ठरवून शिक्षा सुनावली आहे. सरकारतर्फे
अतिरिक्त सरकारी अभियोक्ता म्हणुन श्रीमती भानुप्रिया एन पेटकर यांनी सबळ पुरावा सादर करत आरोपीला शिक्षेप्रत पोहोचवले आहे. तर
अभियोग कक्ष प्रभारी उपनिरीक्षक अतुल पाटील, कोर्ट पैरवी हवालदार सुधाकर गायकवाड, कोर्ट अंमलदार हवालदार आर.डी. गायकवाड यांनी सदर गुन्हयातील आरोपीतास शिक्षा लागण्याच्या दृष्टीने वेळोवेळी पाठपुरावा केला.
इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीत दि. २५ अॉगस्ट २०२२ रोजी दुपारी दीड वाजता ही घटना जाधव पेट्रोल पंप, पाथर्डी सर्कल जवळ, वडनेर रोड, पाथर्डी गांव येथे घडली होती. यातील फिर्यादी महिला नामे जुबेदा युसूफ खान (वय ३७ रा. मारुती मंदीरा समोर, पाथर्डी गांव) जाधव पेट्रोल पंप येथे सेल्स वुमन म्हणुन नोकरी करत होत्या.
यातील फिर्यादी व आरोपी नामे प्रमोद प्रकाश गोसावी यांचे ६ वर्षापूर्वी इगतपुरी येथे राहण्यास असताना प्रेमसंबंध होते. फिर्यादीने आरोपी सोबत प्रेमसंबंध तोडुन देखील आरोपीने वेळोवेळी फिर्यादी सोबत रहाण्याचा आग्रह धरला असता त्यास फिर्यादीने सोबत राहण्यास नकार दिला.
त्याचा राग मनात ठेवून फिर्यादी ही पेट्रोल पंपावर डयुटीवर असतांना, आरोपीने पेट्रोल पंपाचे पाठीमागील कम्पाउंडच्या भिंतीवरून उडी मारून पेट्रोल पंप आवरात प्रवेश करून लपवून ठेवलेला लोखंडी कोयता बाहेर काढून फिर्यादीला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने तिचेवर प्राणघातक हल्ला केला. लोखंडी कोयत्याने फिर्यादीच्या डोक्यावर व दोन्ही पायांवर सपासप वार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला म्हणुन सदर आरोपीता विरुध्द इंदिरानगर पोलीस ठाणे येथे भादंवि कलम ३०७, ३२६, ३२३, ५०४ अन्वये गुन्हा दाखल केला होता. या गुन्हयाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक, निसार सैयद यांनी केलेला असून त्यांनी आरोपीविरुध्द सबळ पुरावे गोळा करून, गुन्हा शाबीत होण्याचे दृष्टीने मेहनत घेऊन , अतिशय चिकाटीने तपास केला व आरोपींविरुध्द मा. जिल्हा व सत्र न्यायालय, नाशिक येथे दोषारोपपत्र दाखल केले होते.

























