नाशिक – विशेष प्रतिनिधी
शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक केल्यास अधिक परतावा मिळेल, असे आमिष दाखवून कसबे वणी (ता. दिंडोरी) येथील एकाला ३६ लाखांना गंडवण्यात आले होते. मात्र याबाबतची तक्रार येताच ग्रामीण पोलिसांनी ‘गोल्डन अवर सायबर मदत’ या संकल्पनेद्वारे तातडीने कारवाई करत २० लाखाहून अधिक रक्कम गोठवण्यात यश मिळवले आहे.
याबाबतचे अधिक वृत्त असे की, कसबे वणी (ता. दिंडोरी) येथील तक्रारदार यांना शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यास सायबर भामट्याने सांगून अधिक परतावा मिळून देतो असे आमिष दाखवले. त्यामुळे तक्रारदाराने वेळोवेळी अनेक बँक खात्यात सुमारे ३६ लाख रूपये भरले. सायबर भामट्यांनी दिलेल्या ऍपमध्ये तक्रारदार यांनी भरलेल्या रक्कमेची दुप्पट रक्कम त्यांना दिसू लागली. त्यावेळी त्यांनी ती काढण्याचा प्रयत्न केला असता त्यांना असे सांगण्यात आले की, तुम्हाला ही रक्कम काढण्यासाठी काही टॅक्स भरावा लागेल त्याकरीता तुम्हाला अजून पैसे भरावे लागेल. त्यावेळी तक्रारदाराला समजले की आपली फसवणुक झालेली आहे.
तेव्हा तक्रारदार यांनी लागलीच ग्रामीण पोलिसांचे
सायबर पोलिसांशी संपर्क साधण्याचा निर्णय घेतला. पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर
यांच्या गोल्डन अवर सायबर मदत संकल्पनेतुन सुरू करण्यात आलेला मोबाईल क्र. ७६६६३१२११२ यावर संपर्क साधला. त्यावेळी सदर तक्रारीचे गांभिर्य लक्षात घेत पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांचे मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दिगंबर थोरात, हवालदार प्रमोद जाधव यांनी सायबर क्राईम पोर्टलवर तात्काळ तक्रारदार यांनी भरलेल्या पैशाची माहिती घेवून तक्रार नोंदवली. तक्रार नोंदवल्यानंतर लागलीच तक्रारदार यांचे एकुण २०,१५,८७४/- रूपये थांबवण्यात सायबर पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांना यश आलेले आहे.
नागरिकांना आवाहन
याव्दारे नाशिक ग्रामीण जिल्हयातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, आपण अनोळखी फोन कॉल्सवर विश्वास ठेवुन आपल्या बँक खात्याची वैयक्तीक माहिती अनोळखी व्यक्तीस देवु नये. कोणतीही बँक अशा प्रकारची माहिती फोनव्दारे विचारत नाही. बँक खात्याविषयी माहितीकरीता संबंधीत बँकेच्या शाखेत जावुन खात्री करावी. तसेच फोनवर पाठविण्यात आलेल्या अनोळखी लिंक विषयी माहिती नसल्यास क्लिक करू नये. आपल्या बरोबर अशी कोणत्याही प्रकारची फसवणुक झाल्यास लागलीच जवळील पोलीस स्टेशनला किंवा सायबर पोलीस स्टेशनला संपर्क साधावा. तसेच ऑनलाईन तक्रारीकरीता १९३०, १९४५, १४४०७ यांना किंवा सायबर पोलीस स्टेशन कडील क्रमांक ०२५३-२२००४०८/७६६६३१२११२ यावर संपर्क करावा.

























