नाशिक – विशेष प्रतिनिधी
वटपोर्णिमा सण निर्विघ्नपणे संपन्न व्हावा यासाठी गस्त घालणाऱ्या गुंडा विरोधी पथकाच्या जाळ्यात देशी बनावटीचे एक पिस्टल व जिवंत काडतूस मिळाले आहे. याप्रकरणी सतिष विष्णु खेतरे (वय-२५, रा. राहुल नगर, महादेव मंदीराजवळ, टाकळी रोड) यास जेरबंद करण्यात आले आहे.
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, उपनिरीक्षक मलंग गुंजाळ, पोलीस अंमलदार विजय सुर्यवंशी, प्रदिप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, राजेश राठोड, कल्पेश जाधव, प्रविण चव्हाण, कल्पेश जाधव, अशोक आघाव, सुनिता कवडे यांनी ही कारवाई केली आहे.
वटपोर्णिमेच्या निमित्ताने मंगळसूत्र खेचून नेण्याच्या घटना टाळण्यासाठी तसेच टवाळखोरांवर लक्ष ठेवण्यासाठी गुंडा विरोधी पथक उपनगर व नाशिकरोड पोलीस ठाणे हद्दीत गस्त घालत असताना नाशिक-पुणा रोडवरील गांधीनगर या शासकीय वसाहतीच्या गेटवर एकजण गावठी पिस्टल घेवून येणार असल्याची बातमी गुंडा विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार मंगळवारी सापळा रचण्यात आला. गेटजवळ असलेल्या पानटपरी जवळ पोलिसांना पाहून संशयित पळू लागला. त्यास पाठलाग करून पकडण्यात आले. संशयिताची अंगझडती घेतली असता देशी बनावटीचे पिस्टल व ०१ जिवंत काडतुस हस्तगत करण्यात आले आहे. संशयिताविरुद्ध भारतीय हत्यार कायदयाप्रमाणे व पोलीस आयुक्त यांचे विनापरवाना अग्नीशस्त्र बाळगण्याचे मनाई आदेशाचे उल्लंघन केले म्हणुन पुढील कारवाईसाठी उपनगर पोलीस ठाणेचे ताब्यात देवून गुन्हा नोंद केला आहे.

























