नाशिक – विशेष प्रतिनिधी
पावसाळी अधिवेशनात विधान परिषदेत मोबाईलवर पत्ते खेळण्याचा कथित डाव राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा पिच्छा सोडतना दिसत नाही. राज्याचे असंवेदनशील कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा तातडीने राजीनामा घेऊन राज्याला संवेदनशील कृषीमंत्री द्या, असे राकडे राज्यातील महाविकास आघाडीच्या खासदारांनी केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांना घातले. तर तो व्हिडिओ सभागृहाचे कामकाज सुरू असतानाचेच असल्याचे सांगत आ. रोहित पवार यांनी पुन्हा सभागृहातील कामकाजाच्या आवाजासह दोन व्हिडिओ ‘एक्स’ वर पोस्ट करत ना. कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
महाविकास आघाडीच्या खासदारांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह जी चौहान यांची संसदेच्या अधिवेशनादरम्यान भेट घेतली. याप्रसंगी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे, शिवसेना ठाकरे गटाचे खा. अरविंद सावंत तसेच खा. बजरंग सोनवणे, डॉ. अमोल कोल्हे, धैर्यशील मोहिते, विशाल पाटील, श्रीमती गायकवाड , प्रतिभाताई धानोरकर आदी उपस्थित होते.
‘महाराष्ट्राच्या विधानसभेत रमी खेळणारा तसेच सातत्याने शेतकरी विरोधी भूमिका मांडणारा कृषीमंत्री राज्याला नको. राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे सातत्याने आपल्या वादग्रस्त विधाने आणि वर्तणूकीमुळे चर्चेत आहेत. शेतकऱ्यांना अरेरावी करण्याचा प्रसंग असो की कर्जमाफीच्या संदर्भात केलेले विधान असो. त्यांनी आपल्या विधानांमुळे महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासण्याचे काम केले आहे. त्यांच्या या असंवेदनशील वागण्यामुळे महाराष्ट्राचे मोठे नुकसान तर होत आहेच तसेच राज्याच्या उज्ज्वल परंपरेला धक्का देखील बसत आहे. म्हणूनच त्यांचा तातडीने राजीनामा घेऊन त्यांच्याऐवजी संवेदनशील आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असणारा संवेदनशील कृषीमंत्री महाराष्ट्राला द्यावा अशी मागणी मविआ खासदारांनी केली.
पत्त्याची कोणती जाहिरात ‘स्किप करण्यासाठी ४२ सेकंद लागतात हो ?
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी ‘एक्स’ वर ना. माणिकराव कोकाटे यांचे व्हिडिओ पोस्ट करत राजीनाम्याची मागणी केली आहे. आ. पवार यांनी ‘एक्स’ वर टाकलेली पोस्ट पुढीलप्रमाणे….
सभागृहाचं कामकाज संपलं होतं हे कृषिमंत्री महोदयांचं विधान धडधडीत खोटं आहे. उलट विकासाच्या मूळ प्रवाहापासून दूर असलेल्या आदिवासी बांधवांना दुधाळ जनावरं देण्याच्या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर सभागृहात चर्चा सुरु होती, पण ‘ओसाड गावच्या पाटलांना’ या चर्चेत रस नसावा… आणि मला सांगा पत्त्याची कोणती जाहिरात skip करण्यासाठी ४२ सेकंद लागतात हो? विझताना दिव्याची ज्योत मोठी होते, तसंच काहीसं कोकाटे साहेबांचं झालंय.. आज राजीनामा देऊन शेतकऱ्यांवर ते उपकार करतील, असं वाटत होतं पण ‘गिरे तो भी टांग उपर’ अशी त्यांनी भूमिका घेत कोर्टात जाण्याची भाषा केली, हे दुर्दैव आहे. मंत्री महोदय स्वतःला वाचवण्यासाठी आज जेवढा खटाटोप करत आहेत त्यापेक्षा दिलेल्या पदाला न्याय देण्यासाठी केला असता तर ही वेळ आली नसती.
विधिमंडळाची अप्रतिष्ठा होऊ नये म्हणून आवाज असलेले हे व्हिडिओ शेअर करणं मी टाळत होतो, पण मंत्री महोदयांनी कोर्टात जाण्याची भाषा केल्याने नाईलाजाने मला सत्य जनतेच्या कोर्टात आणावं लागतंय.. आता चौकशी करायचीच तर कृषीमंत्री पत्ते खेळत होते की नाही याचीही चौकशी करावी आणि ही चौकशी निष्पक्ष पद्धतीने होण्यासाठी नैतिकता दाखवून कोकाटे साहेबांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा. महत्त्वाचं म्हणजे सत्य हे झाकणार नसल्याने राजीनामा देण्यासाठी पुढील अधिवेशनाची कशाला वाट पाहता आणि शेतकऱ्यांना सहन करायला लावता?
https://x.com/RRPSpeaks/status/1947544585862787572?t=_jDuwNanqU5CX0En-LMDdQ&s=19

























