– पंचवटी गुन्हे शोध पथकाची कामगिरी
पंचवटी – प्रतिनिधी
फुलेनगरमधील राहुलवाडी येथे सागर जाधव याच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणातील फरार संशयित दिपक सुनिल विर (वय ३३, रा. पालीका बाजार ससमोर, शनिमंदिर जवळ, पेठरोड) यास पंचवटी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने मखमलाबाद परिसरात सापळा रचून ताब्यात घेतले आहे. यामुळे यातील अटक झालेल्या संशयितांची संख्या आता १४ झाली आहे. तर उर्वरीत आठ जणांचा शोध सुरू आहे.
याबाबतचे अधिक वृत्त असे की, पेठरोडवरील राहुलवाडी (फुलेनगर) येथे १७ सप्टेंबरला रात्री उशिरा सागर विठ्ठल जाधव (वय ३५) या युवकावर गोळीबार झाला होता. या हल्ल्याला निकम व उघडे टोळीतील पूर्ववैमनस्य तसेच वर्चस्ववादाची किनार होती. यात जाधव हा गंभीर जखमी झाल्याने पंचवटी पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला होता. यातील १३ जणांना अद्यापपर्यंत अटक करण्यात आली होती. तर उर्वरीत फरारींचा शोध सुरू होता. यातील संशयित दिपक विर हा मखमलाबाद परिसरात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे अंमलदार नितीन पवार यांना समजली. त्यांनी याबाबत वरिष्ठांना माहिती दिल्यानंतर सापळा रचून त्यास अटक करण्यात आली.
वरिष्ठ निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक (गुन्हे) सुनिल पवार, गुन्हे शोध पथकाचे सहायक निरीक्षक सतिश शिरसाठ, हवालदार शिंदे, महेश नांदुर्डीकर, काळे, लोणारे, गायकवाड, अंकुश काळे, परदेशी, बाहिकर, वायंकडे, चितळकर, पवार, देशमुख, अमित शिंदे, श्रीमती शिंदे यांनी ही कामगिरी बजावली आहे.
माजी नगरसेवकासह १४ जण अटकेत
सागर जाधव या युवकावर झालेल्या गोळीबाराची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, उपायुक्त मोनिका राऊत, सहायक आयुक्त संगिता निकम यांनी पंचवटी पोलिसांना मार्गदर्शनपर सूचना केल्या होत्या. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली पंचवटी पोलिसांनी यातील १४ आरोपींना अटक केली आहे.
या हल्ल्यात प्रत्यक्ष सहभाग नसला तरी कटात सहभागी असल्याचे तांत्रिकदृष्टया निष्पन्न झाल्याने भाजपाचा माजी नगरसेवक इंजि. जगदीश पाटील यास पंचवटी पोलिसांनी अटक केल्याने राजकीय वतृळात खळबळ उडाली होती. निकम टोळीचा अमरावती कारागृहात शिक्षा भोगणारा किरण निकम व इंजि. जगदीश पाटील यांची लॉजमध्ये हल्ल्यापूर्वी बैठक झाली होती. त्यात प्रत्यक्ष घटनेत सहभागी असणाऱ्यांचाही समावेश होता. यातील आठजण अद्याप फरार आहेत.

























