– यंदा ५०४ चारचाकींची जास्त विक्री, ३६४४ नवीन वाहनांची नोंद…
पंचवटी – सुनील बुनगे
यंदाचा नवरात्रोत्सव ‘आरटीओ’ अर्थात प्रादेशिक परिवहन विभागाला लाभदायक ठरला आहे. यंदाच्या नवरात्रोत्सव सोमवार दि.२२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान ‘आरटीओ’ मध्ये सुमारे ३ हजार ६४४ नव्या वाहनांची नोंद झाली असून, त्या माध्यमातून २३ कोटी २३ लाख ५७ हजार ४८९ रुपयांचा महसूल मिळाला आहे. गत वर्षाच्या तुलनेत ३ कोटी ७६ लाख ६९ हजार ५३८ रुपयांचा अतिरिक्त महसूल जास्त मिळाला आहे. यादरम्यान यंदा २९८ नव्या वाहनांची नोंद झाली असून ५९४ जास्त चारचाकींची जास्त विक्री झाली आहे.
सण-उत्सवादरम्यान नागरिकांकडून घर, इलेक्ट्रॉनिक वस्तू, सोने, चांदी अन् वाहनांच्या खरेदीला पसंती देतात. या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल बाजारपेठेत होत असते. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या सणांना आणि विशेषतः गुढीपाडवा, गणेश चतुर्थी, नवरात्रोत्सव सुरू झाल्यापासून ते दसऱ्यापर्यंत तसेच दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन अशा सण-उत्सवांना अनेक नागरिक काहीना काही खरेदी करत असतात. यात फ्लॅट, व्यावसायिक गाळे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, सोने, चांदी याबरोबर दुचाकी, चारचाकी वाहन आदी नवीन वस्तूंना प्राधान्य देतात. यामुळे बाजारपेठेतसुद्धा कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. सण – उत्सवापूर्वी वाहनांचे बुकिंग केले जाते आणि मुहूर्त बघून वाहन घरी घेऊन जातात.
प्रादेशिक परिवहन कार्यालयात यावेळी नवरात्रोत्सवात पहिल्या माळेपासून ते दसऱ्यापर्यंत १ हजार ६०९ दुचाकी तर १ हजार ५९६ नव्या चारचाकी वाहनांची नोंद झाली आहे . ट्रॅक्टर (३४), बस (४), बांधकाम उपकरणे वाहन (२), क्रेन बसवलेले (१), डंपर (७), उत्खनन करणारा एनटी (४), गुड्स कॅरियर (२६५), हार्वेस्टर (२), मोटर सायकल – स्कूटर (१ हजार ६०९), मोपेड (६), मोटार कॅब (४०), चारचाकी कार (१ हजार ५९६), थ्री व्हीलर – गुड्स कॅरिअर (४), प्रवास रिक्षा (६९), जनरेटर व्हॅन (१) अशा प्रकारे नवीन वाहनांची नोंद झाली आहे.
– तीन कोटी ७६ लाखांचा जास्त महसूल…
सण २०२४ मध्ये प्रादेशिक परिवहन विभागाला १९ कोटी ४६ लाख ८७ हजार ९५२ रुपयांचा महसूल मिळाला होता. तर ३ हजार ३४६ नव्या वाहनांची नोंद झाली होती. यावर्षी २३ कोटी २३ लाख ५७ हजार ४८९ रुपयांचा महसूल मिळाला असून ३ हजार ६४४ नव्या वाहनांची नोंद झाली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत ३ कोटी ७६ लाख ६९ हजार ५३८ महसुलात वाढ झाली आहे.
– चारचाकी वाहनांना वाढली मागणी…
यावर्षी ३ हजार ६४४ नव्या वाहनांची नोंद झाली असून गेल्या वर्षाच्या तुलनेत २९८ जास्त वाहनांची नोंद झाली आहे. यात विशेषतः चारचाकी नव्या वाहनांची नोंद झाली असून गेल्या वर्षाच्या तुलनेत ५०४ नव्या चारचाकी वाढल्या आहेत. दुचाकी वाहनांच्या विक्रीत मात्र १९२ ने घट झाली आहे. डंपर ७ ने घटले आहेत. प्रवासी रिक्षा १० ने तर गुड्स करिअर थ्री व्हीलर १० ने घटल्या आहेत. गेल्या महिन्यात जीएसटी काहीसा घटल्याने देखील चारचाकी वाहनांच्या मागणीत वाढ झाल्याचे दिसून येते. तर व्यावसायिक वाहनांना पूर्वी एकरकमी कर होता. परंतु एक जुलै पासून या वाहनांचा एकरकमी कर कमी करून त्यांचा रोड टॅक्स वाढल्याने त्या माध्यमातून करात पर्यायाना महसुलात वाढ झाली आहे.

























