पंचवटी – प्रतिनिधी
तपोवनातील रामसृष्टी उद्यानात फिरायला गेलेल्या डेंटल कॉलेजमधील चौघा विद्यार्थ्यांना मारहाण करून मोबाईल तसेच रोकड लुटण्यात आल्याची घटना रविवारी रात्री आठ वाजता घडली. यात तीन विद्यार्थीनी व एका विद्यार्थ्याचा समावेश आहे. आडगाव पोलिसांनी चौघा टवाळखोरांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंचवटी डेंटल कॉलेजमध्ये ‘बीडीएस’ च्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या युवतीने दिलेल्या तक्रारीत तिला व सहकाऱ्यांना आलेला कटू अनुभव नमूद केला आहे. कॉलेजला सुट्टी असल्याने तीन मैत्रिणी व एक मित्र असे रविवारी रात्री ८.३० वाजेदरम्यान तपोवनातील रामसृष्टी गार्डनमध्ये फिरत होते. यावेळी तिथे चार टवाळखोर मुले आलेत. त्यांनी विद्यार्थ्यांच्या डोळयावर प्लॅश लाईट चमकवले व पैसे मागू लागले. तेव्हा विद्यार्थ्यांनी त्यांना ‘तुम्ही पहिले प्लॅश लाईट बंद करा’. याचा त्या राग आल्याने त्यातील दोन मुलांनी विद्यार्थ्याला मारहाण सुरु केली. सोबतच्या युवती त्यास वाचवण्यासाठी धावल्या तेव्हा टवाळखोरांनी त्यांना शिवीगाळ व मारहाण सुरु केली.
तेव्हा फिर्यादी युवतीने आपला रेडमी कंपनीचा मोबाईल काढून मदतीसाठी आपातकालीन नंबरवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता एकाने मोबाईल हिसकावून घेतला. युवतीने मोबाईल मागितला असता त्या टवाळखोराने ५०० रुपये मागितले. पैसे दिल्यानंतरही फोन देत नसल्याने विद्यार्थ्यानेही एक हजार रुपये दिले. तरी फोन परत न देता ते टवाळखोर निघून गेले. नंतर विद्यार्थीनीने आपल्याच मोबाईलवर संपर्क साधला असता टवाळखोरांनी दोन हजार रुपये द्या व ब्रिजखाली येऊन मोबाईल घेऊन जा असे सांगितले. मात्र त्यानंतर टवाळखोरांनी मोबाईल बंद केला. आडगाव पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून टवाळखोरांचा शोध सुरू आहे.

























