नाशिक – विशेष प्रतिनिधी
‘आपला मावळा’ या दुर्गसंवर्धन संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांची स्वच्छता व संवर्धन मोहिम रविवारी भरपावसाची तमा न बाळगता उत्साही जोषात रामशेज किल्ल्यावर राबवण्यात आली. या मोहिमेंतर्गत किल्ल्यावर स्वच्छता अभियान राबवण्यात आले. तसेच वृक्षारोपण करण्यात आले. ट्रिगार्ड लावणे, सूचना फलक, सौर दिवे, आणि मुख्य प्रवेशद्वार बसवण्यात आले.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, दक्षिण अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके, दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे, नाशिकचे शिवसेना (ठाकरे गट) खासदार राजाभाऊ वाजे, आमदार सुनील भुसारा, ज्येष्ठ नेते शेटे, जिल्हाध्यक्ष दत्तात्रेय पाटील, प्रदेश उपाध्यक्ष कोंडाजी आव्हाड, उदय सांगळे, नाना पिंगळे, पुरुषोत्तम कडलग, समता परिषद जिल्हाध्यक्ष डॉ. योगेश गोसावी, पराग भगरे आदींसह मोठ्या संख्येने नागरिक यावेळी उपस्थित होते. यावेळी किल्ल्यावर प्रभू श्रीराम व सीतामाई यांचे दर्शन घेण्यात आले. सर्व मावळ्यांनी मिळून जिजाऊ वंदना केली आणि “आपला मावळा…गडकोट संवर्धन प्रतिज्ञा” घेतली. पावसाच्या हलक्या सरी आणि धुकट हवामानातही गडप्रेमींच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण गड उत्साहाने न्हालेला होता. रामशेज किल्ला खर्या अर्थाने शिवगर्जनेने दणाणून गेला होता.

यावेळी बोलताना खा. लंके म्हणाले, ही केवळ गडांची साफसफाई नसून, ही आपल्या इतिहासाचे, संस्कृतीचे आणि अभिमानाचे जतन करण्याची ध्यासमय मोहीम आहे. “आपला मावळा” या मोहिमेला मिळणारा प्रतिसाद पाहून मन खूप आनंदित होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे दुर्ग हे आपल्या अस्मितेची आणि शौर्याची साक्ष आहेत. त्यांच्या संवर्धनासाठी आम्ही कायम कार्यरत राहू, असे अभिवचन त्यांनी दिले. ही केवळ सुरुवात आहे… महाराष्ट्राचे प्रत्येक दुर्ग तेजस्वी करण्यासाठी आमची पावलं अविरत चालत राहतील, असा विश्वासही खा. लंके यांनी बोलून दाखवला.
या उपक्रमातून इतिहासाचे जतन होईल आणि मराठी माणसाला अभिमानाचे स्फुरण चढेल अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या कार्याचे कौतुक केले. छत्रपती संभाजी महाराजांशी जोडले गेलेले इतिहासातील एक सुवर्णपान किल्ले रामशेजच्या लढाईला वाहिलेले आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या मावळ्यांनी तब्बल ६५ महिने हा किल्ला झुंजत ठेवला होता. स्वराज्याच्या प्रेरणेने स्फूरलेल्या या ऐतिहासिक वास्तूची आपल्या हातून थोडी थोडकी सेवा घडली याचा आनंद असल्याचं पाटील म्हणाले.




























