– अंमली पदार्थ विरोधी पथकाची कामगिरी…
नाशिक – विशेष प्रतिनिधी
द्वारका परिसरातील पखाल रोड येथील बहुचर्चित दंगलीचा म्होरक्या व कुख्यात गुन्हेगार अकील पिर मोहम्मद शेख उर्फ बंटी शेख (वय ३९, रा. खंडोबा चौक, वडाळा गाव) यास अंमली पदार्थ विरोधी पथकाने नाट्यमयरित्या पाठलाग करून जेरबंद केले आहे. त्याविरुद्ध खून, प्राणघातक हल्ला यासह विविध कलमान्वये सात गुन्हे दाखल आहेत.
शहर पोलिसांनी गुन्हेगारी विरूद्ध कठोर मोहीम उघडलेली असतानाच विविध गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपींचा माग काढण्याच्या सूचना पोलीस आयुक्त संदिप कर्णिक यांनी दिल्या होत्या. त्यानुसार शहरात गस्त करत असताना अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या वरिष्ठ निरीक्षक सुशिला कोल्हे यांना पखाल रोड येथील दंगलीचा म्होरक्या व कुख्यात गुन्हेगार अकील पिर मोहम्मद शेख उर्फ बंटी शेख हा घरी परतल्याचे खात्रीशीर वृत्त कळाले. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक कोल्हे यांनी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना बंटी शेख यास ताब्यात घेण्याचे आदेश दिले.
त्यानुसार, घराजवळ सापळा रचण्यात आला. मात्र पोलीस आल्याची चाहूल लागताच बंटी शेख हा गच्चीवरून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र पोलिसांनी त्यास शिताफीने अटक केली. बंटी शेख हा रेकॉर्डवरील कुख्यात गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध इंदिरानगर पोलीस ठाण्यात पाच, भद्रकाली पोलीस एक तर घोटी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे. त्याच्या अटकेने पखाल रोडवर दंगल घडविण्याच्या कटाची उकल होण्यास मदत मिळणार आहे.
पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, गुन्हे शाखेचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक आयुक्त संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या वरिष्ठ निरीक्षक सुशिला कोल्हे, सहायक निरीक्षक सचिन चौधरी, विशाल पाटील, सहायक उपनिरीक्षक ताजणे, गायकर, बेंडाळे, हवालदार डंबाळे, कोल्हे, सौंदाणे, नांद्रे, सानप, बागडे, गणेश वडजे, फुलपगारे यांनी ही कामगिरी बजावली आहे.

























