नाशिक – विशेष प्रतिनिधी
पावन गोदावरी तीर्थावर रामतीर्थ गोदावरी सेवा समिती, नाशिक यांच्या वतीने आयोजित “गोदावरी आरती व समरसता संध्या” हा विशेष सोहळा उत्सवी आणि भावपूर्ण वातावरणात अत्यंत यशस्वीरित्या पार पडला. मनमाड येथील गुरुद्वारा श्री गुप्तसर साहिब येथील पूज्य जत्थेदार बाबा रणजीतसिंगजी यांच्या पावन उपस्थितीने संपूर्ण रामघाट परिसर धन्य झाला. त्यांच्या आशीर्वादाने, मार्गदर्शनाने आणि नेतृत्वाने झालेल्या या ऐतिहासिक सोहळ्यात शीख समाजाच्या पारंपरिक “जो बोले सो निहाल” घोषणांनी गगन दुमदुमला.
दशगुरु परंपरेचे प्रतीक श्री गुरु ग्रंथ साहिबजी यांच्या समोर अत्यंत भावपूर्ण आरती संपन्न झाली. धार्मिक सौहार्द, परंपरागत श्रद्धा व राष्ट्रीय एकात्मतेचा संगम म्हणून हा सोहळा अनेकांच्या मनात कायमचा कोरला गेला. या समरसता संध्येला राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय अनेक मान्यवरांचा सन्मानपूर्वक सहभाग लाभला.
त्यामध्ये रामेश्वर नाईक (मुख्यमंत्री सहाय्यता निधी समन्वयक), सुकांत सेनापती (कुलगुरु, सोमनाथ विद्यापीठ), प्रा. बिहारीलाल शर्मा (कुलगुरु, संपूर्णानंद संस्कृत विद्यापीठ, काशी), डॉ. वाचस्पती मिश्र (अध्यक्ष, उत्तर प्रदेश संस्कृत संस्थान) तसेच बलजीतसिंग सिब्बल, इंदरसिंग घटोडे, मलकितसिंग बल, चरणदीपसिंग, जसपालसिंग सिद्धू, राजकमलसिंग, हरप्रीत छाबडा, सम्मी बग्गा, रणधीरसिंग रेणू उपस्थित होते.

श्री रणजीतसिंग आनंद व गोपाल लाल यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले डॉ. अंजली वेखंडे (महिला विश्वस्त), सौ. अशीमा केला (कोषाध्यक्ष), डॉ. अभय वालिया (सुप्रसिद्ध हृदयरोग चिकित्सक), गोपाल लाल यांचीही याप्रसंगी उपस्थिती लाभली. चैतन्य गायधनी व हितेश चंदवाणी यांनी शीख समाजाच्या युवा प्रतिनिधींचे विशेष आत्मीयतेने स्वागत केले. सौ. अशीमा केला, कविता देवी, डॉ. अंजली वेखंडे यांनी शीख भगिनींचा सन्मानपूर्वक सत्कार केला.
नृसिंह कृपादास, वैभव क्षेमकल्याणी, धनंजय बेळे या तिर्थ पुरोहितांचा समरसतेत विशेष सहभाग होता. यावेळी हर हर महादेव व जो बोले सो निहाल या घोषणांनी रामघाट दुमदुमला. कु. स्वरा क्षेमकल्याणी व लोकेश सावंत यांच्या नेतृत्वाखाली सामूहिक गोदावरी आरती भक्तिभावाने पार पडली. आरतीनंतर गुरुद्वारा श्री गुप्तसर साहिब यांच्यातर्फे हजारो भाविकांना पवित्र लंगर प्रसाद देण्यात आला.

या ऐतिहासिक समरसता संध्या सोहळ्याचे सूत्रसंचालन मुकुंद खोचे आणि रणजीतसिंग आनंद यांनी सुसंगत, समर्पक व प्रभावी शैलीत केले. यानिमित्ताने हजारो शीख बांधव, संत, तिर्थपुजारी व सनातन परंपरेचे श्रद्धावान उपासक या दिवशी एकत्र आले होते. ही आरती केवळ धार्मिक विधी नव्हती, तर ती एक सांस्कृतिक समरसतेचा, श्रद्धेचा आणि राष्ट्रीय ऐक्याचा दीपस्तंभ ठरली. रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचे सर्व पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या, सेविकावृंद यांनी परिश्रमपूर्वक कार्यक्रम यशस्वी केला. समितीच्या वतीने विश्वस्त आर्किटेक शैलेश देवी, प्रफुल्ल संचेती यांनी मान्यवरांचे स्वागत व अभिवादन केले अध्यक्ष जयंत गायधनी यांनी आभार मानले.

























