– प्रभू श्रीरामाचे लाईव्ह दर्शन होणार….
पंचवटी – प्रतिनिधी
स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) पुन्हा एकदा काळाराम मंदिराला मोठे योगदान दिले आहे. बँकेतर्फे १३ लाख ५० हजार रुपये किमतीची अत्याधुनिक एलईडी वॉल मंदिराला प्रदान करण्यात आली आहे. बँकेतर्फे दोन वर्षांपूर्वी १५ लाख रुपये किमतीची सोलर प्रणाली मंदिराला देण्यात आली होती.
काळाराम मंदिर परिसरात बसविण्यात आलेल्या या एलईडी वॉलच्या माध्यमातून भाविकांना गर्दीच्या वेळी प्रभू श्रीरामाचे थेट (लाईव्ह) दर्शन घेता येणार आहे. तसेच काळाराम मंदिराचा इतिहास, महतीचा माहितीपट मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये दाखविण्याचा मंदिर प्रशासनाचा मानस आहे. सदरची एलईडी वॉल वॉटरप्रूफ असून, कंपनीतर्फे तिला तीन वर्षांची वॉरंटी देण्यात आली आहे. या उपक्रमामुळे भाविकांना मंदिराची माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सुलभतेने उपलब्ध होणार असल्याचे मंदिर प्रशासनाने सांगितले.
एसबीआय मार्फत नेहमी भक्तांना प्रसाद देण्यासाठी श्री काळरामाची फ्रेम व कापडी पिशवी देखील देण्यात येते. याप्रसंगी एसबीआय तर्फे अरविंद कुमार, प्रवीण कुमार तसेच यज्ञेश झंवर आदी उपस्थित होते व श्री काळाराम संस्थानाचे विश्वस्त डॉ. एकनाथ कुलकर्णी, मंदार जानोरकर शुभम मंत्री व धनंजय पुजारी आदी उपस्थित होते.

























