– मातापित्याने फोडला टाहो….
नाशिक – विशेष प्रतिनिधी
वडनेर दुमाला गावाच्या मुख्य चौकात आर्टिलरी सेंटरच्या कारगिल प्रवेशद्वाराजवळ असलेल्या
लष्करी वसाहतीतून बिबट्याने पळवून नेलेल्या दोन वर्षीय श्रुतिक गंगाधर या बालकाचा छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह बुधवारी दुपारी सापडला. यामुळे मंगळवारी रात्रीपासून चिंतेत असलेल्या माता पित्यांनी मृतदेह पहाताच टाहो फोडला. तर लष्करी जवान, ग्रामस्थ व शोध मोहिमेत सहभागी झालेलेही शोकमग्न झाले होते.
रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला तीन वर्षीय आयुष भगत याचा बिबट्याने पळवून नेल्याची घटना अद्यापही विस्मरणात गेलेली नसताना ऐन नवरात्रीत घडलेल्या दुसऱ्या घटनेने नागरिकांमध्ये संतप्त वातावरण आहे.
याबाबतचे अधिक वृत्त असे की, कारगिल प्रवेशद्वारालगत बाजूने लष्करी जवानांचे एम.एम. क्वार्टर वसाहत आहे. या वसाहतीत शिरलेल्या बिबट्याने मंगळवारी (दि.२३) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास अंगणात खेळणारा लष्करी
जवानाचा दोन वर्षाचा श्रृतिक या चिमुकल्याला
जबड्यात धरून धूम ठोकली. त्याच्या रडण्याचा आवाज येताच पित्याने बाहेर धाव घेतली असता बिबट्या वेगाने पळत नदीकडे जात असल्याचे त्यांच्या नजरेस पडले. यावेळी आजूबाजूला असलेल्या जवानांनी आरडाओरड करत धाव घेतली. सुमारे शंभर मीटरपर्यंत पित्यासह त्यांचे सहकारी धावत सुटले. मात्र बिबट्या पसार झाला होता.
या घटनेचे वृत्त समजताच नाशिक वनपरिक्षेत्र कार्यालयातील पथकाने धाव घेतली. मंगळवारी मध्यरात्री उशिरापर्यंत वनविभागाच्या पथकांसह लष्करी जवानांकडून जंगलात व वालदेवीच्या पात्रालगत त्याचा शोध घेण्यात आला. परंतू तो हाती लागला नाही. तो मृतदेह अखेरीस बुधवारी दुपारी मिळून आल्याने उपस्थितांनी हळहळ व्यक्त केली.

























