मथुरा – विशेष प्रतिनिधी
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे प्रमुख परमपूज्य गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांच्या आशीर्वादाने व गुरुपुत्र नितीनभाऊ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली दैवी स्पंदनांनी भारलेल्या पवित्र गोवर्धन नगरीत आज शुक्रवारपासून (२७ जून) श्रीमद् भागवत ज्ञानयज्ञ सप्ताहाला अपूर्व उत्साहात प्रारंभ होत आहे.
भगवान श्रीकृष्णाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गोवर्धन नगरीत कार्ष्णि आश्रमाच्या भव्य प्रांगणात आजपासून ४ जुलैपर्यंत सेवेकऱ्यांचा हा गोपाळमेळा रंगणार आहे. आज सकाळी सात वाजता पितृ तर्पणानंतर विष्णू पूजा त्यानंतर भूपाळी आरती आणि प्रधान संकल्प होऊन प्रत्यक्ष सामुदायिक पठणाला प्रारंभ होईल. दुपारी साडेबारा वाजेपर्यंत वाचन झाल्यानंतर दुपारचे सत्र तीन वाजता सुरू होईल. दुपार सत्रात विशेष सेवा, उपक्रम आणि निरूपण सादर केले जाईल. सायंकाळी ६:३० ची महाआरती झाल्यावर गीताई आणि विष्णुसहस्रनाम स्तोत्राचे पठण होऊन नामसंकीर्तन झाल्यानंतर दिवसभराच्या सेवेची सांगता होईल. दर दिवशी विशेष सेवांचा अपवाद वगळता अशाच पद्धतीने सेवेचे नियोजन करण्यात आले आहे. एकाच वेळी हजारो सेवेकरी बसून पारायण करतील शिवाय उष्म्याचा त्रास होणार नाही अशी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. सेवेकऱ्यांना सात्विक भोजन आणि निवासाची व्यवस्थाही सेवामार्गातर्फे करण्यात आली आहे.
पूर्वसंध्येला जल्लोषात निघाली महामिरवणूक..
गोवर्धन मंदिरापासून कार्यक्रम स्थळापर्यंत श्रीमद् भागवताची अत्यंत उत्साही वातावरणात, जल्लोषात राधे- राधे आणि स्वामीनामाच्या जयघोषात भव्य महामिरवणूक काढण्यात आली. हजारो सेवेकरी भागवत नगरी दाखल झाल्यानंतर गुरुपुत्र नितीनभाऊ मोरे यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. भगवान श्रीकृष्णाच्या नगरीत परमपूज्य गुरुमाऊलींच्या पावन सान्निध्यात सहभागी झालेले सारे सेवेकरी भाग्यवान आहेत. पुढील सात दिवस अत्यंत श्रद्धेने आणि मनोभावे आपल्या हातून सेवा घडेल अशा सदिच्छा त्यांनी दिल्या.



























