नाशिकरोड – विशेष प्रतिनिधी
शरिरा विरूध्द, मालाविरूध्द तसेच खंडणीचे गुन्हे
दाखल असलेला नाशिकरोडमधील सराईत गुन्हेगार अनिकेत उर्फ केरला राजु जॉन (वय २४, रा. भारती मठ, सुभाष रोड) यास पोलिसांनी ‘एमपीडीए’ अन्वये एक वर्षासाठी मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त किशोर काळे, सहायक आयुक्त डॉ. सचिन बारी यांनी सराईत गुन्हेगारांवर एमपीडीए कायदयान्वये प्रतिबंधक कारवाई करणे बाबत आदेशित केले होते. त्यानुसार या संशयिताविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याने नाशिकरोड पोलिसांनी त्याच्याविरुद्ध ‘एमपीडीए’ कायद्यान्वये कारवाई करण्याचा प्रस्ताव पाठवला होता.
त्यास स्थानबध्द करण्याचा आदेश १० जून रोजी मंजूर झाला. परंतू नाशिक शहरामध्ये तसेच सिन्नर व वावी परिसरामध्ये शोध घेण्यात आला. परंतू तो हाती लागला नाही. रविवारी (दि. २७) तो मनमाड येथे असल्याची माहिती उपनिरीक्षक संदीप पवार यांना मिळाली. त्यानुसार गुन्हे शोध पथकाने तत्काळ मनमाड येथे जात तांत्रिक व मानवी संसाधनाचा वापर करून त्यास मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. त्याची रवानगी मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.
नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरीष्ठ निरीक्षक जितेंद्र सपकाळे, निरीक्षक बडेसाहब नाईकवडे, तसेच गुन्हे शोध पथकाचे सहायक निरीक्षक प्रविण सुर्यवंशी, उपनिरीक्षक संदीप पवार, हवालदार अविनाश देवरे, विजय टेमगर, नितीन भामरे, विशाल कुंवर, समाधान वाजे, नाना पानसरे, अजय देशमुख, प्रशांत नागरे यांनी ही कामगिरी केली आहे.

























