नाशिक – विशेष प्रतिनिधी
शहरात चोरट्यांचा सुळसुळाट वाढला आहे. पंचवटी, अंबड, उपनगर, नाशिकरोड व देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घडलेल्या चेन स्नॅचिंग, घरफोडीच्या वेगवेगळ्या घटनांमध्ये चोरट्यांनी तब्बल सात लाखांचा ऐवज चोरून नेला आहे. अशा घटनांना रोखण्यासाठी पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
पंचवटीत चेन स्नॅचिंगच्या दोन घटना
पंचवटीतील मखमलाबाद रोड व हिरावाडीत घडलेल्या चेन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये चोरट्यांनी पादचारी महिलांच्या गळ्यातील एक लाखांचे सोन्याचे दागिने खेचून पळवले आहेत. उषा अरूण पवार (वय ६५, रा. साई चावडी, नवनिर्माण चौक, मखमलाबाद नाका) या मखमलाबाद रोडवरील गोवर्धन एम्पायर, हेमकुंजजवळ येथून रात्री ९ वाजता जात असताना काळया रंगाची मोपेड मोटर सायकलवरून दोघे जण आले. त्यापैकी मागे बसलेल्याने त्यांच्या गळ्यातील ३५ हजार रुपये किंमतीची सोन्याची पोत खेचून पळवली.
सौ. सविता दिपक पाटील (वय ४१, रा. साई मुरली बंगला, त्रंबकनगर, हिरावाडी) या रात्री पावणेदहा वाजता बोडकेनगर परिसरात शतपावली करत असताना काळया रंगाची मोपेड मोटर सायकलवरून दोघे जण आले. त्यापैकी मागे बसलेल्याने त्यांच्या गळ्यातील ६५ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र खेचून पळवले. याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. उपनिरीक्षक सोनवणे तपास करत आहेत.
तिसरी घटना देवळाली कॅम्पमध्ये घडली. शहाजी चंद्रन आर (वय ३४, हल्ली रा. उमराव विहार, देवळाली कॅम्प, मुळ रा. मु.पो. थुम्बकोड, ता कलकुलम, जि. कन्याकुमारी, तामिळनाडु) हे पत्नी व दोन मुलांसह रविवारच्या आठवडे बाजारात खरेदीसाठी गेले होते. सायंकाळी ६.३० वाजता भाजीपाला घेत असताना गर्दीचा फायदा घेत मुलगा इशान याच्या गळ्यातील १६ ग्रॅम वजनाची व ८० हजार रूपये किंमतीची सोन्याची चेन हातोहात लंपास केली. देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे हवालदार सिद्धपुरे तपास करत आहेत.
वाईन शॉप फोडले…दोन लाख पळवले
नाशिकरोडमधील सुभाषरोड परिसरात असलेल्या वासवाणी ब्रँडी हाऊस या दुकानाचे लोखंडी शटर व पत्रा कापून तसेच उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश केला. दुकानातील काऊंटरमध्ये असलेली दोन लाखांच्या नोटा व नाणी चोरून नेल्या. याप्रकरणी अमित गुलाब ओचानी (रा. प्रेम निवास बंगलो, रूद्राक्ष सोसायटी, करन्सी नोट प्रेस जवळ, सानेगुरूजी नगर, मोटवाणी फॅक्टरी रोड) यांच्या तक्रारीनुसार नाशिकरोड पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून सहायक निरीक्षक सूर्यवंशी तपास करत आहेत.
घरफोडीमध्ये तीन लाखांचा ऐवज पळवला
मोनीष गोविंदराव देवरे (वय ४२, रा. २०४, वरियन स्पेस, गोविंद नगर) या सनदी लेखापालाच्या निवासस्थानाच्या लाकडी दरवाज्याचे लॅच व कडीकोयंडा कशाच्या तरी साहायाने कट करून चोरट्यांनी आत प्रवेश केला. घरातून सोन्याचे कर्णफुले, अंगठी, चांदीची साखळी रोकड असा एक लाख ८० हजारांचा ऐवज चोरून नेला. अंबड पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक बागूल तपास करत आहेत.
पुष्पा शामकांत अहिरे (वय ५७, रा. श्रध्दा एनक्लेव्ह सोसायटी, यशवंतनगर, मॅट्रो मॉलच्या पाठीमागे, बोधले नगर) यांच्या घराच्या दरवाज्याचे कडी कोयंडा कशाच्या तरी सहायाने तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. बेडरूम मधील कपाटात लॉकरमध्ये ठेवलेला ३० ग्रॅम वजनाचा व एक लाख २० हजार रूपये सोन्याचा राणी हार हा कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी नेला आहे. उपनगर पोलीस ठाण्याचे सहायक उपनिरीक्षक बकाल तपास करत आहेत.

























