– कुशल, स्वरा व अनन्या यांना राज्य विजेतेपद
नासिक – क्रीडा प्रतिनिधी
जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनच्या वतीने व महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटनेच्या अधिपत्याखाली आयोजित केशिका पुरकर राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत नाशिकच्या टेबल टेनिसपटूंनी ३ सुवर्ण व एक रजत पदक पटकावून आपले वर्चस्व राखले. १९ वर्षाखालील मुलींच्या गटात नाशिकच्या प्रथम मानांकित स्वरा करमरकरने पुण्याच्या नायशा नेवासकर हीचा ६-११, ११-७, १३-११, ४-११, ११-९, १५-१३ असा ४-२ ने पराभव करून अजिंक्यपद पटकावून नाशिकला पहिले सुवर्णपदक पटकावून दिले.
१९ वर्षाखालील मुलांच्या गटात कुशलने अंतिम फेरीत प्रथम मानांकित पुण्याच्या ईशान खांडेकरचा ६-११, ११-८, ११-८, ७-११, ११-४, ११-८ असा ४-२ ने पराभव करून विजेतेपद पटकावले. या सामन्यात कुशलने अनुभवाचा पुरेपूर वापर करून ईशान खांडेकर याला शेवटपर्यंत डोके वर काढू न देता सामन्या वरची आपली पकड कायम ठेवत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.
महिला एकेरीत प्रथम मानांकित टीएसटीएच्या अनन्या चांदे हिने नाशिकच्या सायली वाणीचा ११-२, ११-६, ८-११, १३-११, ४-११, ११-४ असा ४-२ ने पराभव करत विजतेपद पटकावले. या सामन्यात दोघीनी फोरहँड बॅकहॅन्ड अशा विविध फटक्यांचा वापर करून खेळामधली चुरस कायम ठेवली. शेवटी अनन्या हिने सायली वर मात करत सुवर्णपदक पटकावले. यामुळे सायलीला या सामन्यात रजत पदकावर समाधान मानावे लागले.
पुरुष एकेरीत अंतिम फेरीत नाशिकच्या कुशल चोपडा ने टीएसटीटीएच्या सागर कस्तुरे चा १२-१०, ८-११, १०-१२, ११-७, ११-१३, ११-५, ११-७ असा ४-३ ने पराभव करत विजयश्री प्राप्त केली . या झालेल्या अटीतटीच्या लढतीत दोन्हीही खेळाडूंनी आपले कसब दाखवत शेवटपर्यंत विजयाकडे वाटचाल सुरु ठेवली. सातव्या गेम पर्यंत चाललेल्या या सामन्यात कुशल ने सहजपणे हा गेम जिंकून आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केले. अशा प्रकारे चोपडाने दुसरे विजेतेपद मिळवत दुहेरी मुकुटाचा मान संपादित केला.
स्पर्धेचा बक्षीस समारंभ ऑलिंपियन दत्तू भोकनळ, नासिक मर्चंट्स को. ऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन हेमंत धात्रक, माजी चेअरमन सोहन भंडारी, संचालक आकाश छाजेड व नासिक जिमखाना सचिव राधेशाम मुंदडा यांच्या शुभ हस्ते पार पडला. विजेत्या खेळांडूंना रोख पारितोषिक व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे दत्तू भोकनळ व हेमंत धात्रक यांनी मनोगत व्यक्त करत विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. प्रमुख पाहुण्याचा संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड यांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी स्पर्धेसाठी बहुमोल सहकार्य करणाऱ्या सर्वश्री मुकुंद कुलकर्णी, अजय केवलरामानी, आदित्य गोगटे व श्रेयस महाजन यांचा संघटनेच्या वतीने स्मुतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नरेंद्र छाजेड यांनी केले. या प्रसंगी व्यासपीठावर शेखर भंडारी, राजेश भरवीरकर, अभिषेक छाजेड आदि मान्यवर उपस्थित होते.

























