– पंचवटी पोलिसांची धाडसी कामगिरी…
पंचवटी – विशेष प्रतिनिधी
फुलेनगरमधील राहुल वाडी येथे सागर विठ्ठल जाधव याच्यावर गोळीबार करणाऱ्या प्रतिस्पर्धी टोळीसोबत कटात सहभागी असल्याच्या गंभीर आरोपावरून पंचवटी पोलिसांनी भाजपाचे माजी नगरसेवक इंजिनिअर जगदीश पाटील याला ताब्यात घेतले आहे. त्यास वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले असून त्यानंतर अटकेचे सोपस्कार पार पडतील. दरम्यान राहूल धोत्रे खून प्रकरणात माजी नगरसेवक उद्धव निमसे याला अटक झाल्यानंतर आता जगदीश पाटील कायदेशीर कचाट्यात सापडल्याने भाजपाच्या प्रतिमेला धक्का बसल्याचे बोलले जात आहे.
फुलेनगर मधील राहुलवाडी येथे १७ सप्टेंबरला रात्री उशिरा अंत्यसंस्कार आटोपून ओट्यावर बसलेला सागर विठ्ठल जाधव (वय ३५) यास जिवे ठार मारण्याचे उद्देशाने विकी उत्तम वाघ व विकास उर्फ विकी विनोद वाघ व इतर साथीदार यांनी पूर्व वैमनस्य व वर्चस्ववादातून पिस्तुलातून गोळी झाडली होती. ही गोळी त्याच्या डाव्या डोळयाच्या खाली लागून तो गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर अद्याप उपचार सुरु आहेत. याप्रकरणी पंचवटी व भद्रकाली पोलिसांचे गुन्हे शोध पथक तसेच गुंडा विरोधी पथकाने संयुक्त कामगिरी करत ११ जणांना अटक केली होती. तर उर्वरीत पाच जणांचा अद्याप शोध सुरू आहे.
दरम्यान, रविवारी सकाळी पंचवटी पोलिसांनी गोपनीय पद्धतीने कारवाई करत भाजपाचे माजी नगरसेवक इंजिनिअर जगदीश पाटील यास अटक केली. तो तारवालानगर परिसरात वास्तव्यास होता. गोळीबार प्रकरणी अटकेत असलेल्या संशयितांच्या अधिक चौकशीत पाटील याचा या कटात सहभाग असल्याचे समोर आल्याची चर्चा आहे. या कारवाईबाबत पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी दुजोरा दिला आहे.
————————————————————
‘अब की बार…..’
शहरात महापालिका निवडणुकीच्या हालचालीला प्रारंभ होत असतानाच व कुंभमेळा जवळ आलेला असताना महापालिकेत बहुमत मिळवून ‘ट्रीपल इंजिन’ चे सरकार आणण्याचा भाजपाचा मानस आहे. त्यासाठीच ‘अब की बार….१०० पार’ चा नारा देण्यात आल्याची चर्चा आहे. मात्र अगोदर उद्धव निमसे याला खून प्रकरणात व आता जगदीश पाटील याला खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटकेला सामोरे जावे लागल्याने भाजपाच्या प्रतिमेला धक्का बसला आहे. विशेष म्हणजे रविवारी ना. गिरीश महाजन नाशिकमध्ये असतानाही पोलिसांनी कारवाई केल्यामुळे तपास यंत्रणेकडे पाटील विरुद्ध ठोस पुरावे असल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाला आगामी निवडणुकीत स्वच्छ चेहऱ्यांना संधी देण्याची वेळ आल्याचे अधोरेखित झाले आहे.


























