नाशिक – विशेष प्रतिनिधी
अल्पवयीन बालिकेचे अपहरण करून बलात्कार करणारा मोहम्मद रईस मंजुर शहा (वय २७, रा. मु.पो. खमरिया कोईलार, ता. निगासन, जि. लखीमपुर खिरी) यास अवघ्या सात तासात त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सामुंडी गावातून जेरबंद करण्यात आले आहे. तो उत्तर प्रदेशात पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना इंदिरानगर पोलिसांनी ही कामगिरी केली.
इंदिरानगर परिसरात अपहण व पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार होता. तो
ओझर मिग येथील खोडे नगरात असलेल्या बांधकाम साईटवर लपून बसला असल्याची माहिती कळाली. मात्र पोलिसांना तो मिळून आला नाही. फरारी आरोपी हा सामुंडी गांव (ता. त्रंबकेश्वर) येथील बांधकाम साईटवर असल्याची खात्रीलायक बातमी समजल्यानंतर पोलिसांनी छापा टाकून त्यास जेरबंद केले.
इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या वरीष्ठ निरीक्षक श्रीमती तृप्ती सोनवणे, सहायक निरीक्षक (गुन्हे) सुनिल अंकोलीकर यांचे मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हेशोध पथकातील उपनिरीक्षक संतोष फुंदे, पोलीस कर्मचारी सागर परदेशी, दिपक शिंदे, योगेश जाधव, प्रमोद कासुदे, पवन परदेशी, सागर कोळी, अमोल कोथमीरे, सौरभ माळी यांनी केली. या गुन्हयाचा पुढील तपास पोउनि वाल्मीक चौधरी हे करीत आहेत.

























