नाशिक – विशेष प्रतिनिधी
रविवार पेठेतील ‘सुरेख हास्य क्लब’ तर्फे श्रावण महिन्याच्या पहिल्याच मंगळवारी अवधूत स्वामी मठामध्ये मंगळागौरीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य म्हणजे परिसरातील सर्वसामान्य तरुण आणि प्रौढ महिलांनी एकत्र येत पारंपरिक मंगळागौरीचे खेळ सादर केले.
या कार्यक्रमासाठी अनेक दिवसांच्या सरावानंतर हे खेळ आत्मसात केले आणि यशस्वीरीत्या सादर केले. कार्यक्रमाचे मार्गदर्शन आणि सूत्रसंचालन सौ. मंगला भदाणे यांनी केले. त्यांना सौ. रश्मी भोसले आणि डॉ. सुषमा दुगड यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच, सौ. रोशनी निकम यांनी नृत्यदिग्दर्शन केले.


कार्यक्रमाची सुरुवात सौ. वर्षा चांदवडे यांनी ईशस्तवन करून केली. शंखनादाने वातावरणात उत्साह निर्माण झाला आणि राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. या अनोख्या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला, ज्यामुळे पारंपरिक संस्कृतीचा अनुभव सर्वांना घेता आला. या उपक्रमात महिलांचा सहभाग वाखाण्याजोगा होता.

























