– प्रेयसीने सांगण्यावरून काढला काटा…
नाशिक – विशेष प्रतिनिधी
पाथर्डी फाट्यानजिकच्या गरवारे हाऊसच्या पाठीमागे संतोष काळे (वय ३४, रा. लेखानगर झोपडपट्टी, जुने सिडको) या ३४ वर्षीय बिगारी कामगाराचा दगडाने ठेचून खून झाल्याची घटना
आज शनिवारी (दि. १३) सकाळी उघडकीस आली होती. याबाबत इंदिरानगर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपासास प्रारंभ केला असता अहिल्यानगर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने २४ तासाच्या आत यातील दोघा संशयितांना जेरबंद केले आहे. प्रेयसी पार्वती संतोष काळे हिच्या सांगण्यावरून हे कृत्य केल्याची संशयितांनी कबुली दिली आहे.
याबाबतचे अधिक वृत्त असे की, शनिवारी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास काळे यांचा मृतदेह आढळला होता. डोक्यात दगड घालून ठार मारल्याचे निदर्शनास येताच इंदिरानगर पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदविला होता. हा खून रात्री झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, इंदिरानगर पोलीस यातील संशयितांचा शोध घेत असताना अहिल्यानगर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) पथकाला यातील संशयित गावठाण बोल्हेगाव येथे असल्याची माहिती मिळाली. याबाबत वरिष्ठांना कळवल्यानंतर पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘एलसीबी’ चे वरिष्ठ निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली सहायक निरीक्षक हरीश भोये, हवालदार भागवत, शिरसाट, ससाणे आदींच्या पथकाने प्रफुल दिलीप कांबळे (वय ३०, रा. गावठाण बोल्हेगाव, जि अहिल्यानगर) यास ताब्यात घेतले.
त्याची सखोल विचारपूस केली असता त्याने त्याची प्रेयसी पार्वती संतोष काळे हिच्या सांगण्यावरून त्याने आणि त्याचा साथीदार योगेश जाधव (रा. बोल्हेगाव) याच्या मदतीने संतोष काळे यास दारू पाजून त्याचे डोक्यात दगड घालून ठेचून खून केला असल्याची कबुली दिली आहे. त्यानंतर योगेश जाधव यासही ताब्यात घेण्यात आले असून तिसरा साथीदार अल्पवयीन असून तो धवलगिरी (जि. अहिल्यानगर) येथील आहे. संशयितांचा ताबा इंदिरानगर पोलिसांकडे आल्यानंतर प्रफुल दिलीप कांबळे याची प्रेयसी पार्वती संतोष काळे हिचा या कटामागील हेतू स्पष्ट होणार आहे. संशयितांना सहायक निरीक्षक तोडकर व पथक यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

























