– २५% विभागीय आरक्षणानुसार मिळणार संधी…
नाशिक – विशेष प्रतिनिधी
पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या अंमलदारांना गणेशोत्सवादरम्यान खुषखबर मिळाली आहे. २५% विभागीय आरक्षणांतर्गत पोलिस उपनिरीक्षक पदासाठी परीक्षा पुन्हा सुरू होणार असून, या संबंधीचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. या माध्यमातून मेहनती व अनुभवी अंमलदार अधिकारी तयार होणार असून, खातेअंतर्गत भविष्यातील होतकरू अधिकारी होण्याची संधी पुन्हा उपलब्ध होणार आहे.
मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील तीन वर्षांपासून बंद केलेली पोलीस उपनिरीक्षक पदासाठी खात्यांतर्गत परिक्षा सुरू करण्यास पुन्हा परवानगी दिली आहे. किमान पाच वर्ष सेवा बजावलेल्या अंमलदारांना उपनिरीक्षक पदासाठी यापूर्वी खात्यांतर्गत २५% आरक्षणातून परिक्षा देण्यात येत होती. मात्र फेब्रुवारी २०२२ च्या शासन निर्णयानुसार ही परिक्षा बंद करण्यात आली होती.
साधारणपणे पोलीस दलात तरूण तरूणी २१ ते २८ या वयोगटात पोलीस शिपाई म्हणून भरती होतात. त्यांनी साधारणपणे ३३ सेवा केली तर संदर्भाधिन शासन निर्णयाप्रमाणे वयाच्या ५४ वर्षापर्यंत सेवा ज्येष्ठतेनुसार पोलीस उपनिरीक्षक होतात. त्यामुळे ते या पदावर केवळ ३/४ वर्ष सेवा बजावता येते. मात्र वयोमानानुसार शारीरिक व मानसिक अवस्थेचा विचार करता आधुनिक काळातील गुन्ह्यांच्या तपासासाठी त्यांची कार्यक्षमता रहात नाही.
या पार्श्वभूमीवर पोलीस महासंचालकांनी सुकाणु समिती स्थापन केली होती. या समितीने पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील एकूण मंजूर पदाच्या पदभरतीचे पूर्वीप्रमाणे ५०% सरळ सेवेने राज्य लोकसेवा आयोग, २५% सेवा ज्येष्ठतेनुसार व २५% विभागीय परिक्षेद्वारे विहीत करण्यासंबंधी करण्याबाबत शासन आदेश निर्गमित करण्याची विनंती केली होती. त्यानुसार मुख्यमंत्री फडणवीस यांनी हा निर्णय घेतला आहे. यामुळे अनेक मेहनती व अनुभवी पोलिसांना उपनिरीक्षक पदी जाण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.

























