पंचवटी : सुनील बुनगे
मखमलाबाद गावातून अनेक उच्चपदस्त अधिकारी राज्य शासनाच्या विविध विभागात कार्यरत आहेत. राज्याच्या माहिती जनसंपर्क संचालक पदाची जबाबदारी देखील मखमलाबादचे शिवाजीराव मानकर यांनी सांभाळली होती. त्यानंतर मखमलाबाद गावातूनच राज्याच्या माहिती जनसंपर्क विभागात असलेल्या मनिषा मोहनराव पिंगळे या रायगड जिल्हा माहिती व जनसंपर्क अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. नुकतीच त्यांची महाराष्ट्र शासनाच्या दिल्ली येथील महाराष्ट्र परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आल्याने मखमलाबाद ग्रामस्थांसाठी एक अभिमानाची बाब असून त्यांच्या नियुक्तीचे कौतुक होत आहे.
मनिषा पिंगळे यांनी या आधी पुणे विभागीय सहाय्यक संचालक म्हणून तसेच मंत्रालयात सहाय्यक संचालक, (माहिती व जनसंपर्क विभाग) येथेही काम केले आहे. तसेच महाराष्ट्र शासनाच्या लोकराज्य या मासिकासाठी सहाय्यक संपादकाची जबाबदारी सांभाळली आहे. नवनिर्मित पालघर जिल्ह्याच्या पहिल्या माहिती व जनसंपर्क अधिकारी म्हणून त्यांनी काम केले आहे. ठाणे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून त्यांची कारकिर्द यशस्वी राहिली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्या तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या जनसंपर्क अधिकारी पदाची धुरा त्यांनी सांभाळली होती. सुरुवातीच्या काळात दैनिक गांवकरी मध्ये यांनी पत्रकारितेची सुरुवात केली होती. त्या मूळ नाशिक मधील मखमलाबादकर असून मविप्र समाज संस्थेचे माजी संचालक मोहनशेठ पिंगळे यांच्या कन्या आहेत.

























