नाशिक – विशेष प्रतिनिधी
जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा तिढा कायम असतानाच व त्यासाठी राष्ट्रवादी व शिवसेना शिंदे गटात रस्सीखेच असतानाच स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहणाचा मान पुन्हा एकदा भाजपाचे ना. गिरीश महाजन यांनाच मिळाला आहे. मंत्रीमंडळात जिल्ह्यातील चार मंत्री असताना त्यांना मात्र इतर जिल्ह्यात जाऊन ध्वजारोहण करावे लागेल.
महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने आज (दि. ११) एक परिपत्रक काढले आहे. त्यानुसार, येत्या स्वातंत्र्य दिनी राज्यातील जिल्ह्यांमध्ये ध्वजारोहण करणाऱ्या मंत्र्यांची नावे जाहीर करण्यात आली. नाशिकसह रायगडच्या पालक मंत्रीपदाचा तिढा कायम असतानाच नाशिकला ना. गिरीश महाजन तर रायगडमध्ये आदिती तटकरे यांना ध्वजारोहणाचा मान देण्यात आला आहे.
नाशिक जिल्ह्यातून निवडून आलेले व मंत्रीमंडळात समावेश असलेले छगन भुजबळ (गोंदिया), दादाजी भुसे (अमरावती), अॅड माणिकराव कोकाटे (नंदुरबार) तर नरहरी झिरवाळ (हिंगोली) येथे ध्वजारोहण करतील. ना. भुजबळ व भुसे यांनी पूर्वी पालकमंत्री म्हणून कार्यभार सांभाळला आहे.

























