नाशिक – विशेष प्रतिनिधी
मुंबईच्या सायबर क्राईम विभागातून प्रदीप सावंत बोलत असल्याचे सांगून ‘तुमचा मोबाईल क्रमांक व आधारकार्डचा नरेश गोयलच्या मनी लॉड्रींग प्रकरणात देखील सहभाग आहे. त्यामुळे तुम्हाला तुमचे सर्व आर्थिक तपशील व स्थावर मालमत्ता यांची माहीती आम्हास दयावी लागेल’, असे सांगत दोघा नाशिककरांच्या खात्यातील तब्बल एक कोटी ४६ लाख ३० हजार रुपये आपल्या खात्यात वर्ग करून गंडवण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ‘डिजिटल ॲरेस्ट’ ज्या जाळ्यात नाशिककरांना गुंतवून लुटण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत.
याबाबतचे अधिक वृत्त असे की, यातील फिर्यादीला मोबाईल क्रमांक 9520885545 व व्हॉटसअप क्रमांक 8117035716 यावरून संपर्क साधण्यात आला. फिर्यादीचा मोबाईल क्रमांक व आधार कार्डचा नरेश गोयलच्या मनी लॉड्रींग प्रकरणात देखील सहभाग आहे. त्यामुळे तुम्हाला तुमचे सर्व आर्थिक तपशील व स्थावर मालमत्ता यांची माहीती आम्हास दयावी लागेल’ असे सांगून तुमच्या बँक खात्यांमध्ये जमा असलेली रक्कम ही आम्ही सांगितल्याप्रमाणे बँक खात्यांमध्ये वर्ग करण्यास सांगुन फिर्यादीची एकूण एक कोटी १३ लाख ३० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली. तसेच साक्षीदार यांना 96680485846 व 8096162522 या क्रमांक धारकांनी त्यांचे नावे उघडण्यात आलेल्या बँक खात्यांमधून मनी लॉड्रींग झाल्याने अटक होण्याची भिती दाखवून त्यांचेकडील पैशांची पडताळणी करण्याच्या बहाण्याने वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये एकूण ३३ लाख रुपये भरावयास लावुन आर्थिक फसवणूक केली. फिर्यादी व साक्षीदार अशी दोघांची मिळून एक कोटी ४६ लाख ३० हजार रुपयांची ऑनलाईन माध्यमातून आर्थिक फसवणूक केली म्हणुन संबंधित व्हॉटसअप क्रमांक धारक व रक्कम वर्ग झालेले सर्व बँक खातेधारक यांचेविरूध्द सायबर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष ढवळे तपास करत आहेत.

























