मुंबई – विशेष प्रतिनिधी
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अनेक वर्षांनंतर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी सकाळी ‘मातोश्री’ निवासस्थानी जात शुभेच्छा दिल्या. या भेटीनंतर राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे.
राज्याचे माजी मुख्यमंत्री व शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज (दि. २७) सकाळपासूनच ‘मातोश्री’ निवासस्थानी उत्साहाचे वातावरण होते. यानिमित्त शिवसैनिकांच्या उत्साहाला उधाण आलेले असतानाच मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे आगमन झाल्याने शिवसैनिकांचा उत्साह द्विगुणीत झाला. अनेक वर्षांच्या दुराव्यानंतर ठाकरे बंधू हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध करत मराठीच्या मुद्यावर एकत्र आल्यानंतर मराठी जनांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. या बंधूभेटीचा दुसरा अंक आज ‘मातोश्री’ निवासस्थानी रंगला.


मनसेप्रमुखांनी गुलाबाचा भलामोठा पुष्पगुच्छ देत शिवसेना पक्षप्रमुखांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर दोघा ठाकरे बंधूंमध्ये २० मिनिटे चर्चा झाली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेसमोर राज व उद्धव या ठाकरे बंधूंनी छायाचित्रही काढले. या भेटीबद्दल शिवसेना (ठाकरे) व मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये सकारात्मक प्रतिक्रिया उमटत आहेत. तर समर्थकांमध्ये या भेटीबद्दल आनंद व्यक्त केला जात आहे. या भेटीने मनसे व शिवसेना ठाकरे गटामधील युतीच्या चर्चेला पुन्हा बळ मिळाले आहे.


























