मुंबई –
धुळ्यातील शासकीय विश्रामगृहात सापडलेल्या एक कोटी ८५ लाख रुपयांच्या घबाड प्रकरणात खा. संजय राऊत यांनी खळबळजनक खुलासा केला आहे. या खोलीतून ३ कोटी रुपये आधीच बाहेर नेले व १० कोटी जालन्यात पोहोचवले, असा गंभीर आरोप खा. राऊत यांनी केला असून या प्रकरणाचा तपास योग्य रीतीने व्हावा. अन्यथा
अंदाज समितीचे अध्यक्ष खोतकर यांना महाराष्ट्र भूषण व त्यांच्या पीएंना ‘पद्मश्री’ने सन्मानित करून राज्यातील भ्रष्टाचाऱ्यांचा बहुमान करावा, अशी खोचक मागणी खा. राऊत यांनी केली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात खा. राऊत यांनी, धुळ्यातील शासकीय विश्रामगृहात सापडलेली रोकड म्हणजे
धुळ्यातील ठेकेदारांकडून अंदाज समितीच्या अध्यक्षांना ‘नजराणा’ देण्यासाठी खंडणीरूपाने १५ कोटी रुपये जमा करण्यात आले असल्याचे नमूद केले आहे.
खा. राऊत यांनी पाठवलेल्या पत्राचा आशय पुढीलप्रमाणे, भ्रष्टाचारी तुरुंगात जातील, एकाही भ्रष्टाचाऱ्याला सोडणार नाही असे आपण अधूनमधून सांगत असता. मात्र गेल्या काही वर्षांत आपण भाजपचे डम्पिंग ग्राऊंड करून भ्रष्टाचारात बरबटलेला सर्व कचरा स्वपक्षात सामील करून घेतला व त्यांचे समर्थनही आपण करता. त्यामुळे खरे फडणवीस नक्की कोणते असा प्रश्न महाराष्ट्राला पडला आहे.
महाराष्ट्राच्या प्रतिमेला डाग लावणारे एक प्रकरण धुळे जिल्ह्यातील शासकीय विश्रामगृहात घडले. माजी आमदार अनिल गोटे यांनी उघड केलेल्या या प्रकरणात २१ मेच्या मध्यरात्री विश्रामगृहाच्या खोली क्र. १०२ मध्ये १ कोटी ८५ लाखांचे घबाड सापडले. या खोलीतून ३ कोटी रुपये आधीच बाहेर नेले व १० कोटी जालन्यात पोहोचवले. धुळे दौऱ्यावर आलेल्या अंदाज समितीच्या अध्यक्षांच्या ‘पीए’च्या खोलीत ही रक्कम होती व धुळ्यातील ठेकेदारांकडून अंदाज समितीच्या अध्यक्षांना ‘नजराणा’ देण्यासाठी खंडणीरूपाने १५ कोटी रुपये जमा करण्यात आले. यामुळे देशभरात खळबळ उडाली. सुरुवातीपासून हे प्रकरण सर्वच पातळीवर दडपण्याचा व भ्रष्टाचाऱ्यांना वाचविण्याचा प्रयत्न झाला. जनक्षोभ वाढला तेव्हा या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी’ स्थापन करण्याची वरपांगी घोषणा आपण केली. त्या एसआयटीचे पुढे काय झाले? त्याचे प्रमुख कोण? सदस्य कोण? हे समजले नाही.
त्यामुळे एसआयटीची घोषणा ही निव्वळ धूळफेक आहे. आता असे समोर आले की, ‘एसआयटी’ राहिली बाजूला, खंडणीरूपाने जमा केलेल्या या रकमेबाबत एक साधा अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला व प्रकरण दडपण्यात आले. ही बाब लाजिरवाणी व आपण भ्रष्टाचाराच्या प्रकरणात किती गंभीर आहात हे दर्शविणारी आहे. भ्रष्टाचाऱ्यांना अभय देण्याचाच हा प्रकार आहे.
आपल्या राज्यात हे असेच चालणार असेल तर राज्याचे लाचलुचपत प्रतिबंधक खाते बरखास्त करून मोकळे व्हा व भ्रष्ट अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांना ‘महाराष्ट्र भूषण’ व त्यांचे ‘पीए’ किशोर पाटील यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करा असे मी आपणास सुचवीत आहे.
धुळे विश्रामगृह खंडणी प्रकरणाचा तपास झाला तर बऱ्याच गोष्टी बाहेर येतील. विश्रामगृहावर सापडलेले घबाड हे अंदाज समिती अध्यक्षांना ‘नजराणा’ देण्यासाठीच गोळा केले. माझ्या माहितीप्रमाणे धुळे शहरातील व ग्रामीण भागातील रेशन दुकानदारांकडून अंदाज समिती अध्यक्षांना देण्यासाठी ही रक्कम गोळा केली. त्या पिशवीवर ‘R’ लिहिले होते. धुळे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याने तोंडी आदेश देऊन शहरी व ग्रामीण भागातील रेशन दुकानदारांकडून प्रत्येकी १०००० प्रमाणे १ कोटी ४७ लाख रुपये गोळा केले. ही रक्कम फक्त तीन तासांत गोळा केली. पैसे जमा झाले नाहीत तर ‘समिती’चे सदस्य दुकानांवर रेड टाकतील, असे निरोप देण्यात आले व त्यानंतर पैसे जमा केले. याबाबतची अधिक माहिती हवी असेल तर ती मिळू शकेल.
आपल्या राज्यातला भ्रष्टाचार विधिमंडळाच्या समित्यांपर्यंत पोहोचला आहे व आपण फक्त राजकीय मसलती व उद्योग-व्यापारात गुंतून पडला आहात. धुळे खंडणी प्रकरणाचा तपास योग्य दिशेने झाला नाही, तर या प्रकरणातले इतर स्फोट नाइलाजाने करावे लागतील. तूर्त तरी अंदाज समितीचे अध्यक्ष खोतकर यांना महाराष्ट्र भूषण व त्यांच्या पीएंना ‘पद्मश्री’ने सन्मानित करून राज्यातील भ्रष्टाचाऱ्यांचा बहुमान करावा असे आपणास सुचवीत आहे.

























