नाशिक – विशेष प्रतिनिधी
ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने पिंपळगावमध्ये केलेल्या कारवाईमध्ये चार लाख ७२ हजार २०० रुपये किंमतीचा २३ किलो ६१० ग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ जप्त केला आहे. याप्रकरणी अनिकेत संदिप खैरणार (वय २२, रा. उंबरखेड रोड, भावनगर, पिंपळगाव बसवंत, ता.निफाड) यास अटक करण्यात आली आहे.
याबाबतचे अधिक वृत्त असे की, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र मगर यांना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार, पिंपळगाव शहरातील उंबरखेड रोड परिसरात एक इसम हा अवैधरित्या अंमली पदार्थ कब्जात बाळगुन विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती. त्याप्रमाणे ‘एलसीबी’ पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सदर ठिकाणी छापा टाकून, अंमली पदार्थ गांजाची अवैधरित्या विक्री करणारा इसम नामे अनिकेत संदिप खैरणार यास ताब्यात घेतले. त्याचे कब्जातून किं. रू. ४,७२,२००/- चा २३ किलो ६१० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. संदिप हा विनापरवाना बेकायदेशीररित्या मानवी मनावर विपरीत परिणाम करणारा गांजा नावाचा अंमली पदार्थ कब्जात बाळगुन विक्री करतांना मिळुन आला असून त्याचेविरूध्द पिंपळगाव पोलीस ठाणेस एन.डी.पी.एस. कायदा कलम ८ (क), २० (ब), ॥ (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र मगर, उपनिरीक्षक प्रकाश भालेराव, पोलीस अंमलदार नवनाथ वाघमोडे, संदिप नागपुरे, सतिष जगताप, किशोर खराटे, सतिष घुटे, विश्वनाथ धारबळे, योगिता काकड, किशोर बोडके, बालाजी कुंटेवाड, चापोहवा संतोष पाटील, तानाजी झुरडे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

























