नाशिक – विशेष प्रतिनिधी
पावसाळी धुंद हवा आणि त्यासोबत शास्त्रीय संगीताची मैफल यातून रसिकांना सकस गायनाभुती मिळाली. निमित्त होते ते नव्या पिढीतील कलाकारांच्या अविष्काराला हक्काचे व्यासपीठ देण्यासाठी ‘सूर विश्वास’ या अनोख्या मैफलीचे. या मैफिलीत जाई सराफ यांचे शास्त्रीय गायन संपन्न झाले जयेश कुलकर्णी (तबला), शुभांगी भावसार (संवादिनी) यांची त्यांना साथसंगत लाभली तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ.स्मिता मालपुरे यांनी केले. मैफिलीचे हे ५१ वे पुष्प होते.
विश्वास ग्रुपचे कुटुंबप्रमुख विश्वास ठाकूर व रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओच्या समन्वयक ऋचिता ठाकूर हे या उपक्रमाचे आयोजक असून संकल्पना विनायक रानडे यांची आहे. विश्वास गार्डन, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.

जाई सराफ यांच्या मैफिलीला राग अहिर भैरव या शास्त्रीय रागाने सुरुवात झाली. त्यांनी प्रथम बडा ख्याल सादर करत श्रोत्यांना रागाच्या गूढ सौंदर्याची अनुभूती दिली. त्यानंतर राग बिलासखानी तोडी मधील मध्य लय बंदिश सादर करत त्यांनी मैफिलीला एक नाजूक तरी गहीरं वळण दिलं. मैफिलीच्या पुढील भागात जाई सराफ यांनी पं. जितेंद्र अभिषेकी यांच्या दोन भावपूर्ण रचना सादर केल्या “गुरू एक जगी त्राता” आणि “संतांचीया गावी प्रेमाचा सुकाळ” या रचनांमधून त्यांनी अध्यात्मिक भावविश्व प्रेक्षकांसमोर उभं केलं.
याप्रसंगी कलावंतांचा तसेच गायिका वीणा गोखले, रजिंदर कौर यांचा सन्मान स्वराली पणशीकर, चित्रकार मुरलीधर रोकडे, ॲड नंदकिशोर भुतडा, विनायक रानडे यांच्या हस्ते करण्यात आले.

























