नाशिक – विशेष प्रतिनिधी
चुंचाळे परिसरातील औद्योगिक वसाहतीत असलेल्या रूट्स फॉरमॉलेशन या कंपनीत झालेल्या धाडसी चोरीची अवघ्या २४ तासात उकल करण्यात एमआयडीसी पोलीस चौकीतील पथकास यश आले आहे. याप्रकरणी पाच जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यात एका विधिसंघर्षित बालकाचा समावेश आहे. संशयितांकडून चोरीतील सर्व म्हणजेच सात लाख सहा हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मो. वाहीद रजा मो. असलम शेख (वय २२, रा. महेश्वरी प्लाझा जवळ, रामकृष्ण नगर, अंबड लिंकरोड), मनोहर अभयसिंग चुंदावंत (वय २१, रा. प्लॉट नं. १९ गट नं. २६/ए आझाद नगर, अंबड लिंक रोड), हर्षल शिवाजी बडगुजर (वय २१, रा. घरकुल योजना, चुंचाळे शिवार), सुरज सोमा आगळे (वय २४, रा. घरकुल योजना, चुंचाळे शिवार) यांच्यासह एक विधीसंघर्षित बालक यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबतचे अधिक वृत्त असे की, रूट्स फॉरमॉलेशन प्रा. लि (प्लॉट नं. एच-१४०/१, एमआयडीसी, अंबड) या कंपनीचे वॉल कंपाउंड तोडून चोरट्यांनी आवारात प्रवेश केला. कंपनीतून
सात लाख सहा हजार ५०० रुपयांचे एपीसीजी मशीनचे सुटे पार्ट चोरून नेल्याचे निदर्शनास आले. याबाबत ३० जुलै रोजी पोलिसांनी गुन्हा नोंदवला होता.
कंपनीतील चोरीची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त (परिमंडळ २) किशोर काळे, सहायक आयुक्त (अंबड विभाग) शेखर देशमुख यांनी या घटनेची उकल करण्याचे आदेश एमआयडीसी पोलिसांना दिले. त्यानुसार शोध घेतला जात असताना अंमलदार श्रीहरी बिराजदार यांना सदर चोरीतील माल
एमएच.४७ – ई.३१५६ या क्रमांकाच्या वाहनातून नेण्यात आल्याची खात्रीलायक बातमी कळाली. त्यानुसार प्रभारी पोलीस निरीक्षक विश्वास पाटील, उपनिरीक्षक संदीप शेवाळे, हवालदार संदीप साळवे, श्रीहरी बिराजदार, किरण सोनवणे, जितेश शिंदे, योगेश्वर जाधव, श्रीकांत सुर्यवंशी, विश्वास सांकुखे, संदिप खैरनार, अर्जुन कांदळकर, विजय सोनवणे, आवेश शेख यांनी कौशल्याने तपास करून संशयितांना मुद्देमालासह ताब्यात घेतले.

























