नाशिक – विशेष प्रतिनिधी
भ्रष्टाचार, गैरव्यवहार आणि लोकशाही संस्थांचा अपमान करणाऱ्या महायुती सरकारातील कलंकित आणि भ्रष्ट मंत्र्यांची हकालपट्टी करण्याची मागणी संपूर्ण महाराष्ट्रभर होत असताना, या अनुषंगाने शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिक जिल्हा व महानगर तर्फे शिवाजी रोडवरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ सोमवारी (दि. ११) महाराष्ट्र जन आक्रोश आंदोलन करण्यात आले.
उपनेते दत्ताजी नाना गायकवाड, दिंडोरी संपर्कप्रमुख जयंतराव दिंडे, जिल्हाप्रमुख डी.जी. सूर्यवंशी, महानगरप्रमुख प्रथमेश गीते, माजी आमदार व माजी महापौर वसंतराव गीते, माजी महापौर विनायक पांडे, ग्रामीण जिल्हाप्रमुख नितीन आहेर, दुसरे ग्रामीण जिल्हाप्रमुख पिंटू सोनवणे, तसेच यांच्यासह दिलीप मोरे, मसूद जिलानी, सचिन बांडे, सुभाष शेजवळ, विजय काकड, अनिल क्षत्रिय, संपतराव जाधव, गोरख वाघ यांच्यासह जिल्हा सचिव सर्व उपजिल्हाप्रमुख, सर्व तालुकाप्रमुख, सर्व विधानसभा प्रमुख, सर्व विभाग प्रमुख, सर्व उपमहानगरप्रमुख, सर्वमहानगर संघटक, महानगर समन्वयक, शाखाप्रमुख, महिला आघाडी व युवा सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या आंदोलनातून नाशिक जिल्ह्यातील जनतेचा रोष स्पष्ट झाला असून, भ्रष्ट व कलंकित मंत्र्यांची हकालपट्टी होईपर्यंत लढा सुरू राहील, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. तसेच निवडणूक आयोगाने मतांची चोरी केलेली असून त्या मतचोरीमुळे भारतीय लोकशाहीला काळीमा फासला गेला असून, भारतीय संविधानाचे नीतिमूल्य पायदळी तुडविणयात आले आहे, त्याचाही निषेध करण्यात आला.
१४ आमदार-मंत्र्यांवर शिवसैनिकांचा रोष
या आंदोलनात, १४ कलंकित मंत्र्यांचे फोटो लाल “X” वर्तुळासह आणि त्यांच्यावर असलेले गंभीर आरोपांचे फलक हातात धरून कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
भ्रष्ट आणि कलंकित मंत्री व त्यांचे आरोप:
– संजय राठोड (शिंदे गट), कॅबिनेट मंत्री — विविध अधिकार्यांच्या नियुक्तीतील पैशांच्या मोबदल्याचे आरोप; भ्रष्टाचार.
– माणिकराव कोकाटे (राष्ट्रवादी अजित पवार गट), कॅबिनेट मंत्री — विधानसभा सत्रात मोबाईलवर क्रीडा (रमी) खेळणे; शिस्तभंग.
इंद्रनील नाईक (राष्ट्रवादी अजित पवार गट), राज्य मंत्री — खातेदारांच्या वाटपात वादविवाद, प्रशासकीय गैरव्यवहार.
संजय गायकवाड (शिंदे गट), आमदार — कर्मचार्याला मारहाण; लोकशाही संस्थांचा अपमान.
गोपीचंद पडळकर (भाजप), आमदार — विरोधकांशी सार्वजनिक वाद, धमकी, अनुकूल वर्तन.
– किसन कथोरे (भाजप) — आमदार — नगरपालिकेत घोटाळा, भ्रष्टाचार.
– धनंजय मुंडे (राष्ट्रवादी अजित पवार गट), माजी कॅबिनेट मंत्री — सहकारी बँक घोटाळा, भ्रष्टाचार व दबाव.
– नितेश राणे (भाजप), कॅबिनेट मंत्री — सांप्रदायिक, भडकाऊ भाषण, तणाव वाढवणे.
-.संजय शिरसाट (शिंदे गट), कॅबिनेट मंत्री — नोटांच्या बंडलासह व्हिडिओ व्हायरल, आर्थिक अनियमितता.
– योगेश कदम (शिंदे गट), गृहराज्यमंत्री — डान्सबार मालकी, वाळू घोटाळा, सामाजिक व आर्थिक वाद.
– पंकज भोयर (भाजप), राज्य मंत्री — गृहविभागातील ग्रामसेवकांना त्रास देणे, गैरव्यवहार.
– मेघना बोर्डीकर (भाजप), राज्य मंत्री — सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणातील गैरव्यवहार.
– भरत गोगावले (शिंदे गट), कॅबिनेट मंत्री — अघोरी पूजा संदर्भातील नियमांचे उल्लंघन.
– माधुरी मिसाळ (भाजप), राज्य मंत्री — सामाजिक न्याय विभागातील अनियमितता.

























