– मध्यवर्ती कारागृहातील घटना…
नाशिक – विशेष प्रतिनिधी
नाशिकरोड येथील मध्यवर्ती कारागृहात असलेल्या कैद्यांना नातेवाईक तसेच वकिलांशी संपर्क साधता यावा, यासाठी असलेल्या स्मार्ट फोन कार्ड (अॅलन कार्ड) या सुविधेचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यासाठी ठाणे अंमलदार कोपरगांव शहर पोलीस ठाणे (जि. अहिल्यानगर) व वरिष्ठ निरीक्षक, कराड पोलीस ठाणे (जि. सातारा) यांच्या बनावट शिक्का व स्वाक्षरीचा वापर करण्यात आला असून कारागृह प्रशासन व शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी
कारागृह शिपायासह पाच जणांविरुद्ध नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारागृह शिपाई वैभव नामदेव लांडगे (रा. नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह), शिक्षा बंदी क्रमांक १२६४४ दिपक रामभाऊ ढाकणे व इतर तीन अशा पाचजणांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा यांच्या दक्षता पथकातील
प्रदीप नाना हारगुडे (वय ३५) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, एक डिसेंबर २०२४ ते ३१ अॉगस्ट २०२५ दरम्यान नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात ही घटना घडली. दक्षता पथकाने चार सप्टेंबर २०२५ रोजी नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह येथे दिलेल्या भेटी दरम्यान व त्या अनुषंगाने केलेल्या चौकशीअंती नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह येथे स्मार्टफोन सुविधा कार्ड (अॅलन कार्ड) चे कामकाज करणारे कारागृह शिपाई वैभव नामदेव लांडगे व कारागृहामध्ये यापूर्वी दाखल असलेला शिक्षा बंदी दिपक रामभाऊ ढाकणे या दोघांनी माहे डिसेंबर २०२४ ते ऑगस्ट २०२५ दरम्यान इतर अज्ञात आरोपींशी संगनमत करुन स्मार्टफोन सुविधा कार्ड (अॅलन कार्ड) संदर्भाने स्वतःच्या फायदयाकरीता गैरकायदेशिरपणे ठाणे अंमलदार, कोपरगांव शहर पोलीस स्टेशन जि. अहिल्यानगर व वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कराड पोलीस स्टेशन यांचे नावाचे खोटे, बनावट शिक्के तयार करुन त्यांच्या नावाची च्या बनावट सहया करुन खोटे पोलीस व्हेरिफिकेशन घेतले. ते खरे असल्याचे भासवून बनावट शासकीय दस्तऐवज तयार करुन कारागृह प्रशासनाची, शासनाची फसवणुक करुन स्मार्टफोन सुविधा कार्ड (अॅलन कार्ड) सुविधेचा वापर केल्याचे निष्पन्न झाले आहे. नाशिकरोड पोलीस ठाण्याचे निरीक्षक नाईकवाडे तपास करत आहेत.

























