– युवा पदाधिकाऱ्याऐवजी ज्येष्ठाला संधी…कार्यकर्ते दुखावले
पंचवटी – प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षात गेल्या काही दिवसांपासून उमेदवारीवरून निर्माण झालेल्या नाराजीतून अखेर उघड बंडाचे पडसाद उमटू लागले आहेत. मागील 20 वर्षांपासून मोर्चे, आंदोलन आणि संघटनवाढीसाठी कार्यरत असलेले तरुण नेते अमित घुगे यांनी पक्षाकडून होत असलेल्या अन्यायामुळे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या संदर्भात त्यांनी पत्रकार परिषद घेत पक्षाच्या कार्यपद्धतीवर तीव्र टीका केली. या निर्णयामुळे भाजपा उमेदवाराच्या अडचणी वाढणार असून शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराला त्याचा फायदा होणार आहे.
घुगे म्हणाले की, प्रभाग क्रमांक एक (ड) ही जागा यंदा सर्वसाधारण ठेवण्यात आली असून 2017 पासूनच त्यांनी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली होती. सरचिटणीस या पदावर कार्यरत असताना उमेदवारीची मागणी न्याय असल्याचे त्यांनी सांगितले. “पक्षाने दिलेल्या आश्वासनांना फाटा देत 70 वर्षीय ज्येष्ठ उमेदवाराला तिकीट देण्यात आले. प्रभागात फिरणेही ज्यांना कठीण जाते, अशांना नेतृत्व देणे म्हणजे तरुणांचा अपमान आहे,” असा आरोप घुगे यांनी केला. तसेच, “अन्याय करणारा जितका दोषी असतो, त्याहून अधिक अन्याय सहन करणारा दोषी ठरतो. निकाल काहीही लागो, मी निवडणूक लढणारच,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
उमेदवारीसंदर्भात चर्चा करण्यासाठी गेलो असता फोनसुद्धा न उचलल्याचा आरोप त्यांनी शहराध्यक्षांवर केला. यामध्ये आमदार गिरीश महाजन यांचाही हस्तक्षेप नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. घुगे पुढे म्हणाले की, “पक्षात सामाजिक समीकरणांच्या नावाखाली कार्यकर्त्यांचा अपमान केला जात आहे. राज्यातील कार्यकर्त्यांनी केविलवाणे प्रदर्शन करणे थांबवावे. सरचिटणीस या पदाचा राजीनामा मी सकाळी 11 वाजता सादर करणार आहे. नरेंद्र मोदींनी फोन केला तरी माझा निर्णय बदलणार नाही. पक्षाची कार्यपद्धती चुकीची आहे,” असे ते म्हणाले.घुगे यांच्या या भूमिकेमुळे प्रभागातील राजकीय समीकरणे चांगलीच हलणार असल्याचे चित्र आहे.
—————————————————-
घुगे यांच्या बंडखोरीमुळे भाजपा उमेदवार संकटात
भारतीय जनता पार्टीत गेल्या २० वर्षापासून सक्रीय असलेल्या तसेच पंचवटीसह परिसरात पक्षवाढीसाठी सक्रीय असलेल्या अमित घुगे यांनी बंडाचा बिगूल वाजवल्याने या प्रभागात भाजप उमेदवार संकटात सापडला असून त्याचा सर्वाधिक लाभ शिवसेना (शिंदे) गटाच्या उमेदवाराला होणार आहे. घुगे यांनी आतापर्यंत संघटनेत केलेले काम तसेच जनतेत असलेला संपर्क ही त्यांची जमेची बाजू होती. मात्र त्यांनाच संंधी नाकारल्याने निष्ठावंत पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. ही खदखद नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी झालेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट जाणवली.

























