– वेबसाईट अत्यंत संथ गतीने कार्यरत…
पंचवटी । प्रतिनिधी
नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत अवघ्या सहा दिवसांवर येऊन ठेपली आहे. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या राखीव जागांवरील इच्छुक उमेदवारांना उमेदवारी अर्जासोबत जातपडताळणी प्रमाणपत्र अनिवार्य असते. बहुतांश उमेदवारांनी सामाजिक न्याय विभागाच्या ऑनलाईन पोर्टलवर अर्ज सादर देखील केले आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ही वेबसाईट अत्यंत संथ गतीने कार्यरत आहे. त्यामुळे अर्ज प्रक्रिया मोठ्या प्रमाणात रखडली जात आहे. त्यामुळे अनेक उमेदवार संकटात सापडले आहेत.
जात पडताळणीसाठी अर्ज केल्यानंतर वेबसाईट वारंवार बंद पडणे, लॉग-इन न होणे, अर्ज सबमिट न होणे तसेच कागदपत्रे अपलोड करताना तांत्रिक अडचणी येत आहे. परिणामी अनेक अर्ज अर्धवट अवस्थेत अडकून पडत आहेत. जातपडताळणी प्रमाणपत्र वेळेत न मिळाल्यास उमेदवारी अर्जच बाद होत असतो. त्यामुळे उमेदवारांना धडकी भरली आहे. सदर बाब गंभीर असून प्रशासनाने त्याची दखल तत्काळ घ्यावी, अशी अपेक्षा उमेदवारांकडून व्यक्त केली जात आहे.
नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकाचे पडघम सुरू आहेत. उमेदवारी अर्ज विक्री व नामनिर्देशन पत्रे दाखल करण्यास मंगळवार ता.२३ रोजी पासून सुरुवात झाली आहे. उमेदवारांना विविध विभागांकडून आवश्यक ना-हरकत प्रमाणपत्रे व कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. यात अनुसूचित जाती व अनुसुचित जमाती साठी जातपडताळणी प्रमाणपत्र ही आवश्यक बाब आहे. मात्र, उमेदवारांना संकेतस्थळावर अर्ज भरताना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यामुळे उमेदवार पुढे मोठे संकट उभे राहिले आहे.
—————————————————-
विशेषतः पहिल्यांदाच निवडणूक लढवणारे तसेच सर्वसामान्य पार्श्वभूमीतील उमेदवार या प्रक्रियेमुळे अधिकच अडचणीत सापडले आहेत. अर्ज भरण्याची अंतिम तारीख जवळ येऊनही प्रशासनाकडून कोणतीही पर्यायी व्यवस्था किंवा तातडीची मदत उपलब्ध करून देण्यात आलेली नसल्याने उमेदवारांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे.
—————————————————-
सामाजिक न्याय विभागाने तात्काळ वेबसाईटची तांत्रिक क्षमता वाढवावी, अतिरिक्त सर्व्हर सुरू करावेत अथवा ऑफलाईन किंवा तात्पुरती पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी जोरदार मागणी उमेदवारांसह विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून केली जात आहे. अन्यथा नाशिक पंचवार्षिक निवडणुकीत राखीव जागांवरील अनेक इच्छुक उमेदवार निवडणूक रिंगणाबाहेर फेकले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भिती अनेक उमेदवारांनी व्यक्त केली आहे.
‘ —————————————————-

निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी आवश्यक कागदपत्रे पूर्ण करण्याची आम्ही तयारी करत आहोत. मात्र, प्रशासनाच्या तांत्रिक अपयशाचा फटका उमेदवारांना बसत आहे. जातपडताळणीसारखी अत्यावश्यक प्रक्रिया निवडणुकीच्या तोंडावरही सुरळीत नसेल, तर लोकशाहीत समान संधी कशी मिळणार, असा प्रश्न पडतो. वेळेअभावी अर्ज स्वीकृत न झाल्यास त्याची जबाबदारी उमेदवारांवर ढकलली जाऊ नये. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना अप्रत्यक्षपणे निवडणूक प्रक्रियेपासून दूर ठेवले जात असल्याची भावना निर्माण होत आहे. प्रशासनाने मुदतवाढ किंवा तात्पुरती सवलत देऊन न्याय द्यावा, अशी आमची ठाम भूमिका आहे.”
मुकेश गांगुर्डे
अर्जदार

























