– बहिणीच्या डोळ्यादेखत भावाला संपवले…
नाशिक – विशेष प्रतिनिधी
सातपूर व पाथर्डी-वडनेर रोडवरील खुनाच्या घटना ताज्या असतानाच आता नाशिकरोडमधील गोरेवाडी भागात दसऱ्याच्या रात्री उशिरा दांडिया खेळून घरी परतणाऱ्या १९ वर्षीय युवकावर कोयत्यासह धारदार शस्त्राचे वार करून निर्घृण खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. बहिणीच्या डोळ्यादेखत भावाला संपवण्यात आले असून मागील भांडणाचा वचपा काढण्यासाठी हा हल्ला करण्यात आला. यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा दीपक ठाकरे (वय १९, रा. . मोहन जाधव किराणा दुकानाच्या शेजारी, हिवाळेवाडी गोरेवाडी, नाशिकरोड) असे मृत युवकाचे नाव आहे. तर मोईन शेख (उपनगर) याच्यासह तीन विधिसंघर्षित बालकांनी हल्ला केला आहे.
मृत युवकाची बहीण ज्योती मनोज आहीरे (वय ३२) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्या भाऊ कृष्णा व लहान बहीण छाया हिच्यासह गुरूवारी रात्री ११.३० वाजता टिपऱ्या खेळून घरी परतत होत्या.
घरी परत जात असतांना मोईन शेख व इतर संशयित मागून आले. मोईन व कृष्णा यांच्यात दोन दिवसांपूर्वी भांडण झाले होते. मोईन शेख हा कृष्णाला ‘सॉरी, आपण मागच्या भांडणाचे बोलून मिटवून घेऊ’, असे बोलला. चौघेजण भाऊ कृष्णाला घेऊन जाधववाडी कडे जाऊ लागले. तेव्हा ज्योती यांना मोईनच्या कमरेला धारदार शस्त्र असल्याचे दिसले. त्यामुळे त्यांना संशय आला. त्या व कृष्णाचा मित्र तिलक मेहरोलिया संशयितांच्या मागे गेले.
त्यानंतर मागील गल्लीत कृष्णाला नेत मोईन याने मागील भांडणाची कुरापत काढली. मोईन याने कमरेचे धारदार शस्त्र कृष्णाच्या पाठीत खुपसले. तर चिराग उर्फ मोगली बारसे याने कोयत्याने वार केले. प्रकाश उर्फ आशू बारसे यानेही धारदार शस्त्राने हल्ला चढवला. कृष्णाला लाथाबुक्क्याने तसेच धारदार शस्त्राने मारताना पाहून बहीण ज्योतीने आरडाओरड करण्यास सुरूवात केली. तेव्हा संशयितांनी पलायन केले. कृष्णाची रक्तबंबाळ स्थिती पाहून त्यास तात्काळ बिटको रुग्णालयात नेण्यात आले. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने प्राथमिक उपचारानंतर जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. रात्री १२.५० वाजता कृष्णाला जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या घटनेचे वृत्त समजताच नाशिकरोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला असून सहायक निरीक्षक कोरडे पुढील तपास करत आहेत.

























